मुंबई – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांची तुलना कोरोनाशी करताना सांगितले की रस्ते अपघात कोरोना महामारीपेक्षाही मोठी समस्या आहे. त्यासाठी त्यांनी अपघातांच्या संख्येचा दाखला दिला. देशात दररोज रस्ते अपघातात ४१५ जणांचा जीव जातो आणि हे जगात सर्वाधिक आहे, असे ते म्हणाले.
गडकरी म्हणाले की, रस्ते अपघात कमी करण्यासाठी ४० हजार किलोमीटरपेक्षा जास्त महामार्ग सुरक्षा ऑडिटच्या कक्षेत आणले गेले आहेत. भारतात सर्वाधिक रस्ते अपघाताच्या घटना होतात. दरवर्षी जवळपास दीड लाख लोकांचा अपघाती मृत्यू होतो तर साडेतीन लाख लोक जखमी होतात. यात सत्तर टक्के लोक १८ ते ४५ वर्षे वयोगटातील आहेत, असेही ते म्हणाले.
भारतात दररोज रस्ते अपघातात ४१५ जणांचा मृत्यू होणे ही कोरोना महामारीपेक्षाही गंभीर बाब आहे. आपल्यासाठी दरवर्षी स्थिती आणखी वाईट होत चालली आहे. दुर्दैवाने आपण रस्ते अपघातात अमेरिका आणि चीनच्याही पुढे आहोत. त्यामुळेच हे अत्यंत गंभीर असल्याचे मला वाटते, असे ते म्हणाले.
रस्ते सुरक्षा संस्था आयआरएफच्या भारतातील शाखेद्वारा आयोजित एका वेबिनारमध्ये रस्ते सुरक्षेपुढील आव्हाने आणि कार्य योजना या विषयावर गडकरी बोलत होते. घटना कमी करण्यासाठी कोण जबाबदार आहे, हे निश्चित करण्यासाठी आडीट सर्वोत्तम पर्याय असल्याचे ते म्हणाले.
गडकरींनी सांगितले की, अभियांत्रिकी कॉलेज आणि आयटीआयसह आयआरएफसारख्या रस्ते सुरक्षा संस्था ऑडिटसाठी सरकारला मदत करू शकतात. प्रत्येक अभियांत्रिकी कॉलेजला काही आर्थिक सहकार्य करून सुरक्षा ऑडिटसाठी ३०० ते ५०० किलोमीटर दिले जाऊ शकतात, असेही गडकरी म्हणाले