लखनऊ – उत्तर प्रदेशचे मुख्यमत्री योगी आदित्यनाथ यांचे गाव असलेले गोरखपूर सध्या चर्चेत आहे. मात्र गोरखपूर हे नाव या गावाला सहज प्राप्त झालेले नाही. गेल्या २६०० वर्षांमध्ये तब्बल ८ वेळा या गावाचे नाव बदलले आहे. तशी इतिहासात नोंद आहे.
सध्याचे २१७ वर्षांपासून
प्राचीन भारताच्या इतिहासकारांच्या मते गोरखपूर चे नाव कधीकाळी रामग्राम असे होते. कालांतराने जगाला योगाचा परिचय करवून देणाऱ्या गुरु गोरक्षनाथांच्या नावावरून या शहराचे नाव गोरक्षपूर आणि पुढे गोरखपूर झाल्याचे तज्ञ सांगतात. सध्याचे गोरखपूर हे नाव गेल्या २१७ वर्षांपासून असल्याचे समजते.
गोरक्षपूर
याआधी नवव्या शकतातसुद्धा या शहराला गुरु गोरक्षनाथ यांच्या नावाने ‘गोरक्षपूर’ असे ओळखले जायचे. यानंतर जसजसे या शहराचे शासक बदलत गेले, तसतसे शहराचे नावही बदलत गेले. कधी या शहराला सूब-ए-सर्किया तर कधी अख्तनगर, कधी गोरखपुर सरकार तर कधी मोअज्जमाबाद या नावाने हे शहर ओळखले गेले. अंतत: ब्रिटीश शासकांनी सन १८०१ मध्ये या याशाराचे नाव ‘गोरखपुर’ असे ठेवले जे नवव्या शतकातील त्याच्या ‘गोरक्षपुर’ या नावाशी साधर्म्य असणारे आहे.
वेगवेगळी नावे
सर्की शासकांच्या काळात या शहरास सुब-ए-सर्कीया या नावे ओळखले जायचे. औरंगजेबाच्या शासन काळात (1658-1707) गोरखपूर चे नाव मोअज्जमाबाद असे झाले होते. औरंगजेबा चा मुलगा मोअज्जम या भागात शिकारीसाठी आला असता या शहरात काही काळ वास्तव्यास होता. त्याच्याच नावावर शहरास मोअज्जमाबाद असे नाव पडले.
रामग्राम राजधानी
गोरखपूर विद्यापीठाच्या प्राचीन इतिहास विभागाचे पूर्व प्रमुख प्रा.राजवंत राव यांनी सांगितले की आज गोरखपूर मध्ये ज्या ठिकाणी रामगढ तलाव आहे त्या ठिकाणी २६०० वर्षे आधी रामग्राम नावाचे गाव होते. ही कोळी लोकांची राजधानी होती. भौगोलिक आपत्ती आल्यामुळे हे गाव भूमीमध्ये समाविष्ट झाले आणि त्या ठिकाणी तलाव तयार झाला. चंद्रगुप्त मौर्याच्या शासनकाळात गोरखपूरला पिप्पलीवन या नावाने ओळखले जायचे. गुरु गोरक्षनाथ यांच्या प्रभावाने नवव्या शतकात हे नाव बदलून गोरक्षपूर झाले.
कधी होते कोणते नाव?
रामग्राम – इसविसन पूर्व सहावे शतक
पिप्पलीवन – इसविसनपूर्व तिसरे शतक
गोरक्षपुर – नवे शतक
सूब-ए-सर्किया – १३वे आणि १४ वे शतक
अख्तरनगर – १४ व्या शतकानंतर काही काल
गोरखपूर सरकार – १७ व्या शतकाच्या पूर्वी काही काळ
मोअज्जमाबाद – १७ व्या शकतात मुघल काळात
गोरखपूर – १८०१ पासून ते आजतागायत