मुंबई – कोरोनाचे मोठे आव्हान असल्याने त्याला तोंड देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दोन्ही अर्धे डॉक्टर झाले असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. आमच्यासह अनेक नेत्यांना कोरोना झाला. मात्र, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना कोरोना घाबरुन आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीला वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त माहिती जनसंपर्क संचालनालयाने तयार केलेल्या ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात माझं कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात आली. जनतेच्या विकासासाठी हे सरकार बांधील आहे. या शासनाची वर्षपूर्ती ही समर्थ महाराष्ट्राला घडविणाऱ्या निर्धाराची असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना योद्धयांचे आभार मानत कोरोना काळात विकासकामांना खीळ बसणार नाही याची ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
या प्रकाशन सोहळ्याला खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते.