गुवाहाटी : देशभरात अनेक निवडणुकीत उमेदवारांकडून पैसे वाटपासह मतदान यंत्र पळविण्याच्या घटना घडत असतात. सध्या आसाममध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आसाममधील भाजपचे उमेदवार कृष्णेंद्रू पॉल यांच्या पत्नीच्या गाडीत ईव्हीएम मशीन ( मतदान यंत्र ) मिळाल्यानंतर वाद निर्माण होत आहे.
मतदान कर्मचार्यांना मदत करण्यासाठी लिफ्ट दिल्याचे सांगत करीमगंज जिल्ह्यातील पाथरकांडी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कृष्णेंदु पॉल ईव्हीएम चोरण्याचे आरोप फेटाळून लावले असून पॉल म्हणाले की, माझा ड्रायव्हर कारमध्ये होता, तेव्हा मतदान अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे मदत मागितली आणि त्याने मदत केली. काही लोकांनी त्याला थांबवले. मात्र यात आमचा काहीही हात नाही.
दरम्यान, मतदान अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते आयोगाच्या गाडीतून स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम घेऊन जात होते, पण मध्येच गाडी नादुरुस्त झाल्याने त्यांनी लिफ्ट घेतली होती. या घटनेनंतर मात्र पीठासीन अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने निलंबित केले आहे. एका खासगी कारमधील ईव्हीएमवर संतप्त जमावाने हल्ला केला आणि कारची तोडफोड केली. जमावाने केलेल्या हल्ल्यापासून कार आणि निवडणूक अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. आयोगाचे म्हणणे आहे की, ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यांचा शिक्का ( सील ) तोडलेला नाही. यानंतर कोणत्याही प्रकारची भीती दूर करण्यासाठी पुन्हा निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.