बंगळुरू – अंकिता गौर या गर्भवतीने १० किलोमीटर धावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत तिने हे अंतर ६२ मिनिटांत पार केले.
धावणे हे आपल्यासाठी श्वासोच्छवासाईतकेच महत्त्वाचे असल्याचे अंकिता सांगते. गेली ९ वर्षे मी या स्पर्धेत भाग घेत आहे. यामुळेच मला धावण्याने कसलाही त्रास होत नाही. अंकिता ही व्यवसायाने इंजिनिअर आहे. बर्लिन, बोस्टन, न्यूयॉर्क येथील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये तिने भाग घेतला आहे.
या स्पर्धेत तिने भाग घेण्यासाठी काय तयारी केली असं विचारलं असता, तिने सांगितले की, मी दररोज ५ ते ८ किमी. धावण्याचा सराव केला. विशेषतः बाळाच्या विकासासाठी हे अत्यंत उपयुक्त असल्याचेही ती म्हणाली. त्यात जर तुम्ही धावपटू असाल, तर तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होतो. अमेरिकन कौन्सिल ऑफ हेल्थने देखील याची शिफारस केल्याचे दिसते. यापूर्वी तिने टीसीएसमध्ये १० किमी स्पर्धेत पदक पटकावले आहे.
या स्पर्धेत भाग घेण्याबाबत माझी आई जरा साशंक होती. पण डॉक्टरांनी परवानगी दिल्यावर तिने काही हरकत घेतली नाही. माझे पतीदेखील खूप सपोर्ट करणारे आहेत. त्यांनादेखील माझी या सगळ्या काळात खूप काळजी घेतली आहे.