नवी दिल्ली – आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि स्वातंत्र्य युद्धातील प्रमुख सेनानी अशी ओळख असणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी आजही आमच्याकडे असल्याचा जपानचा दावा आहे. पण, त्यांच्या मृत्यूला ७५ वर्षे झाल्यानंतरही त्यांच्या मृत्यूबाबतचा संभ्रम कायम आहे. आज नेताजींची १२५वी
विमान अपघातात झाला मृत्यू
१८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी विमानाने मंचुरिया येथे जात होते. याच प्रवासानंतर ते बेपत्ता झाले होते. दरम्यान, जपानमधील एका संस्थेने त्यानंतर पाचच दिवसांनी असे सांगितले होते की, नेताजी ज्या विमानात होते, त्या विमानाचा तैवानमध्ये अपघात झाला. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पण, त्यानंतर जपान सरकारनेच आपले विधान खोडून काढत १८ ऑगस्ट १९४५ ला कोणताही विमान अपघात झाला नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आजही त्यांचा मृत्यू कसा झाला, हे गुपितच आहे. तर नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचे भारत सरकारने माहितीच्या अधिकारात उत्तर देताना म्हटले होते. पण, सरकारच्या या विधानावर सुभाषचंद्र बोस यांचा परिवार नाराज आहे. याबाबत काहीही निश्चित माहीत नसताना केंद्र सरकार असं कसं काय सांगू शकते, असा सवालही नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांनी केला आहे.
येथे आहेत अस्थी
नेताजींच्या अस्थी आजही टोकयो येथील रेंकोजी मंदिरात जपून ठेवल्या आहेत. तैवानमधील अपघातानंतर नेताजींच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले आणि मग त्या अस्थी टोकयो येथे नेण्यात आल्या. तेव्हापासून त्या तेथेच आहेत.
वेगवेगळी उत्तरे
प्रश्न असा आहे की, नेताजींच्या अस्थी अजूनही जपानमध्येच का आहेत, त्या भारतात का आणल्या जात नाहीत? यावर प्रत्येक सरकार वेगवेगळे उत्तर देत असते. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एका मुलाखतीत दावा केला होता की, चंद्रशेखर यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असताना त्यांच्याकडे जपानकडून एक वेगळीच विनंती आली होती. रिंकोजी मंदिरातील नेताजींच्या अस्थी तुम्ही भारतात घेऊन जाऊ शकता पण, तुम्ही याची डीएनए टेस्ट करू नका, अशी ती विचित्र विनंती होती. तर दुसरीकडे नेताजींचा परिवार तर या अस्थींच्या डीएनए टेस्टसाठी आग्रही आहे.
नेताजींच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाचे लेखक आशिष रे यांनी आपल्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. पण, या मुद्द्यावरून कोलकातामध्ये दंगल उसळू शकते, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर हा मुद्दा मागे पडल्याचे त्यांनी म्हटले आहे.