नवी दिल्ली – देशभरातील सर्वात मोठी संभ्रमावस्था अखेर दूर झाली आहे. नीट व जेईई परीक्षा होणारच असून नीट परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे हॉल तिकीट (अॅडमिट कार्ड) तत्काळ डाऊनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, नीट व जेईई परीक्षेला अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध दर्शविला आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नीट २०२० परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा येत्या १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेवेळीचे नियम कडक करण्यात आले आहेत. परीक्षेपूर्वी दोन तास आधी पोहचणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये ६ फुटाचे अंतर राहणार आहे. तसेच, पाण्याची बाटली विद्यार्थ्यांना स्वतः आणावी लागणार आहे. जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
परीक्षा केंद्रांमध्ये वाढ
नीट परीक्षा २ हजार ८४६ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार होती. कोरोनाचा प्रादूर्भाव आणि विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन परीक्षा केद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळेच देशात आता ३ हजार ८४३ परीक्षा केंद्र करण्यात आली आहेत. तर, जेईई परीक्षेसाठी एकूण ५७० परीक्षा केंद्र होते. ते आता ६६० करण्यात आले आहेत.
अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://ntaneet.nic.in/ntaneet/AdmitCard/AdmitCard.html
अनेक मुख्यमंत्र्यांचा विरोध
नीट व जेईई परीक्षेला अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे केंद्र सरकार व अनेक विरोधी पक्ष यांच्यात तेढ निर्माण झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यात सातहून अधिक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी नीट व जेईई परीक्षेला विरोध दर्शविला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही परीक्षा घेणे अवघड असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी न्यायालयात जाण्याची सूचना काही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.