नाशिक – शासनाने राबविलेल्या ‘चुल मुक्त महाराष्ट्र, धुर मुक्त महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी सूरज मांढरे पुरवठा विभाग व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रम व यशस्वी नियोजनातून नाशिक जिल्हा केरोसीन मुक्त जिल्हा झाला असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासन, पुरवठा विभाग व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यामध्ये दिनांक १ ऑगस्ट २०१८ च्या शासन निर्णयान्वये गॅस जोडणी नसलेचे हमीपत्र सादर करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना अनुदानीत केरोसीन चे वितरण करण्यात येते होते. जिल्ह्यातील सर्व बिगर गॅस जोडणी धारकांना गॅस उपलब्ध करुन देऊन केरोसीन मुक्त जिल्हा घोषीत करणेबाबतची कार्यवाही करण्यात आलेली होती.
त्यानंतर माहे जुन २०१९ अखेर येवला, चांदवड, बागलाण, मालेगाव, इगतपुरी, नांदगाव, दिंडोरी, कळवण, धान्य वितरण अधिकारी नाशिक, नाशिक, निफाड, त्र्यबकेश्वर, सिन्नर व देवळा असे १३ तालुके व ०१ धान्य वितरण अधिकारी यांचे क्षेत्र केरोसीनमुक्त करण्यात आले होते. पाठोपाठ माहे डिसेंबर २०१९ अखेर सुरगाणा व पेठ असे ०२ तालुके केरोसीन मुक्त केल्याने धान्य वितरण अधिकारी मालेगाव यांचे क्षेत्र वगळता सर्व तालुके व धान्य वितरण अधिकारी नाशिक यांचे क्षेत्र केरोसीन मुक्त करण्यात आलेले आहे.
मालेगाव धान्य वितरण अधिकारी यांचे कार्यक्षेत्र कोरोना प्रादुर्भावामुळे केरोसीन मुक्त करणेसाठी अडचणी येत असल्याने माहे ऑगस्ट २०२० पर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रास केरोसीनचे वितरण करण्यात येत होते. माहे सप्टेंबर २०२०पासुन मालेगाव धान्य वितरण अधिकारी यांचा केरोसीन कोटा निरंक झाल्याने त्यांचेही क्षेत्र केरोसीन मुक्त करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील एकुण १५ तालुके व २ धान्य वितरण अधिकारी यांचे क्षेत्र माहे सप्टेंबर २०२० अखेर शासनामार्फत केरोसीन मुक्त करण्यात आलेले असल्याने नाशिक जिल्हा केरोसीन मुक्त झालेला आहे, असेही यासंदर्भात बोलताना पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले आहे.
म्हणून जिल्हा केरोसीनमुक्त : जिल्हाधिकारी मांढरे
याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी सुरज यांनी म्हटले आहे की, केरोसीन पुरवठा ही नेहमीच पुरवठा प्रशासनाच्या दृष्टीने आव्हानात्मक जबाबदारी राहिली आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील अनेक वर्षांपूर्वीची दुर्दैवी घटना अद्याप अनेकांच्या विस्मरणात गेलेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न करून व जास्तीत जास्त लोकांना उज्वला योजनेमध्ये सहभागी करून घेऊन घरगुती केरोसीनचा वापर शून्य वरती आणण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. प्रदूषण मुक्तीच्या दृष्टीने सुद्धा टाकलेले हे एक चांगले पाऊल आहे. आज कोरोनाशी दोन हात करत असतानाच अन्य विषयांकडे देखील लक्ष पुरवून जिल्हा केरोसीन मुक्त झालेला आहे ही बाब अत्यंत समाधानकारक असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.