मुंबई – बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत अभिनेते आणि अभिनेत्री यांच्यातील रिलेशनशिप, ब्रेकअप आणि लग्नाच्या नेहमीच बातम्या असतात. आता अभिनेत्री दिया मिर्झाच्या चाहत्यांसाठी एक बातमी आहे. काही काळापूर्वी दिया घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. मात्र ती आता पुन्हा लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे.
दिया मिर्झा व्हेलेंटाईन डे च्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील उद्योजक व गुंतवणूकदार वैभव रेखी यांच्याशी लग्न करणार आहे. या लग्नाला त्या दोघांचे खास मित्र आणि कुटूंबच उपस्थित असतील. दोघेही कुटुंबे लग्नाबद्दल खूप खुश आहेत आणि त्यासाठी तयारी करत आहेत.
दिया मिर्झा आणि वैभव रेखी दोघेही लॉकडाऊन दरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. दोघांनी लॉकडाऊनमध्ये एकत्र चांगला वेळ घालवला आणि एकमेकांना समजून घेतले. त्याचवेळी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
वैभव यांचे चित्रपटातील कलाकारांशीही चांगले संबंध आहेत. याआधी दिया मिर्झाचे साहिल संघाशी लग्न झाले होते. पण ११ वर्षानंतर दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.
२०१९ मध्ये सोशल मीडियावर दिया मिर्झाने साहिलपासून विभक्त होण्याची घोषणा केली. दिया आणि साहिलनेही सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून आपापल्या भावना व्यक्त केल्या होत्या.