नाशिक – नाशिक साखर कारखाना ते नानेगाव काळे वस्ती या रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात आला. कामही झाले. पण, अवघ्या काही दिवसातच कोट्यवधींचा हा रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत आल्याचे पहायला मिळत आहे. यासंदर्भात होणाऱ्या तक्रारींची दखल आमदार सरोज अहिरे यांनी घेतली. म्हणूनच त्यांनी प्रत्यक्ष या रस्त्याची पाहणी केली. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा आणि झाल्या प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
बंगाली बाबा ते नाशिक सहकारी कारखाना कारखाना, काळे वस्ती रस्त्याच्या कामासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून कारखान्याचा स्वमालकीचा रस्ता शासनाकडे वर्ग केला. त्याला जिल्हा मार्ग ३७ असा क्रमांक दिला. त्यास शासनाने ४ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होण्यासाठी ३० वर्षांपासूनची मागणी कारखाना कार्यक्षेत्रातील चार तालुक्याचे शेतकरी, प्रवासी वर्ग करत होते.
पारले कंपनी ते नाशिक कारखाना मुख्य गेट पर्यतचा रस्ता मृत्युचा सापळा बनला असून या रस्त्यावर तीन ते चार फुटाचे मोठे मोठे खड्डे पडल्याने दुचाकी वाहन चालविताना चालकाला तारेवरची कसरतच करावी लागते आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ठेकेदार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्धधिकारी यांचे आमदार अहिरे यांनी सोमवारी या रस्त्याची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सदर रस्ता तातडीने दुरुस्ती बाबत सूचना दिल्या. यावेळी कारखाना अवसायक रतन जाधव, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, विष्णुपंत गायखे, चेतन जाधव, कांतीलाल गायधनी, दिपक टावरे, कुमार गायधनी, अभिषेक गायखे, भाऊसाहेब गायधनी, शिवराम गायधनी, नामदेव बोराडे,संपत पाळदे, अभय खालकर.ऋषीकेश गायधनी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.