मुंबई – कपिल शर्माला कोण ओळखत नाही? ‘कपिल शर्मा शो’ मुळे तर तो कायम चर्चेत असतो. आज मोठेमोठे पाहुणे त्याच्या शोमध्ये येऊ इच्छितात. पण, एक काळ असा होता की, त्याला जी मुलगी आवडली तिच्या वडिलांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला होता. पण कपिलने हा नकार होकारात बदलावला आणि आज गिन्नी चतराथ सोबत तो सुखाने संसार करत आहे. १८ नोव्हेंबरला गिन्नी हिचा वाढदिवस असतो.
या दोघांची लव्हस्टोरी देखील अनोखी आहे. २००५ मध्ये गिन्नी आयपीजे कॉलेजमध्ये ऑडिशन देण्यासाठी गेली होती. तिथे कपिलने तिला पहिल्यांदा पहिले. कपिल तेथे नाटक शिकवत असे. पहिल्याच भेटीत कपिलला गिन्नी आवडली. त्यानंतर भेटीगाठी होत राहिल्या.
गिन्नीला तू आवडतोस, असे कपिलच्या एका मित्राने त्याला सांगितले होते. त्याने ही गोष्ट थेट गिन्नीलाच विचारली, पण गिन्नीने नकार दिला. माझं शिक्षण आणि काम एकाचवेळी सुरु होतं, आणि हीच गोष्ट गिन्नीला आवडल्याचे कपिलचे म्हणणे आहे. पण कपिलची आई जेंव्हा तिच्या वडिलांकडे लग्नाची बोलणी करायला गेली तेंव्हा तिच्या वडिलांनी नकार दिला. त्यानंतर दोघेही आपापल्या कामात व्यस्त झाले. २०१६ मध्ये कपिलने पुन्हा गिन्नीला प्रपोज केले. यावेळेस मात्र तिच्या वडिलांनी होकार दिला. आणि २०१८ मध्ये या दोघांचे लग्न झाले.