गुवाहाटी – मुलींचे लग्न ही आई वडिलांसाठी मोठी गोष्ट असते. लग्नासाठी म्हणून पै पै जमा करून सोने साठवले जाते. म्हणूनच अनेकदा सोन्याच्या दागिन्यांची भिशी वगैरे सुरू केली जाते. अशाच काही गरीब पालकांसाठी आसाम सरकारची अरुंधती सुवर्ण योजना फायदेशीर ठरते आहे.
अशी आहे योजना
या योजनेनुसार लग्नातील सोने खरेदीसाठी सरकारकडून मुलीला ३० हजार रुपयांची मदत मिळते. ही योजना गेल्या वर्षीच सुरू करण्यात आली असून या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत.
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या योजनेला ‘अरुंधती सुवर्ण योजना’ असे नाव दिले आहे. ज्या मुलींना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी लग्नाची नोंदणी करणे आवश्यक आहे. नवऱ्या मुलीचे शिक्षण १० वी पर्यंत होणे गरजेचे आहे. शिवाय, मुलीच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे ५ लाखांपेक्षा कमी असायला हवे. या योजनेचा फायदा पहिल्या लग्नासाठीच मिळेल. दुसऱ्या लग्नासाठी याचा काहीही फायदा मिळणार नाही. या अटींची पूर्तता तुम्ही करत असाल, तर तुम्ही यासाठी नक्कीच अर्ज करू शकता.
अशी आहे प्रक्रिया
विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत तुम्हाला दागिने दिले जात नाहीत. तर लग्नाची नोंदणी आणि त्याचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर नवऱ्या मुलीच्या खात्यात ३० हजार जमा होतात. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी ३० हजारांचे जे दागिने खरेदी केले आहेत, त्याची बिले जमा करणे आवश्यक आहे. या पैशांचा दुसऱ्या कारणासाठी वापर होऊ नये यासाठी ही काळजी सरकारने घेतली आहे. revenueassam.nic.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला याचा ऑनलाइन फॉर्म मिळेल.
३०० कोटींची तरतूद
आसाम सरकारने २०१९-२० या काळात या योजनेसाठी म्हणून ३०० कोटींची तरतूद केली होती. ही योजना जेव्हा सुरू करण्यात आली, तेव्हा १० ग्रॅम सोन्याची किंमत ३० हजार होती. म्हणजेच सरकार १० ग्रॅम सोन्याचे पैसे गरीब कुटुंबाना देत होते.