नवी दिल्ली – एका क्लिकवर खरेदी करण्यासाठी प्रसिद्ध असलेली जगातली सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या सीईओपदी आता कंपनीचे क्लाउड कम्युटिंग चीफ अॅन्डी जेसी यांची निवड झाली आहे. सीईओपदावरून पायउतार झालेले जेफ बेझोस कंपनीचे नवे कार्यकारी अध्यक्ष असतील, अशी घोषणा कंपनीने केली आहे. हा बदल या वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत करण्यात येणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं.
जेफ बेझोस यांनी १९९४ साली अॅमेझॉनची स्थापना केली होती. एक ऑनलाइन बुकस्टोअर असलेल्या अॅमेझॉनचे रूपांतर जगातील सर्वात मोठ्या ई कॉमर्स कंपनीमध्ये झाले आहे. कंपनीकडून सर्व प्रकारच्या वस्तू विकल्या जातात.
जेफ बेझोस यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यात अॅन्डी जेसी यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांच्याकडे सीईओपदाची धुरा सोपवत असल्याचं कर्मचार्यांना म्हटलं आहे. मला कंपनीचा बोर्ड कार्यकारी अधिकारी आणि अॅन्डी जेसी यांना सीईओ बनवण्यात आले आहे, याचा मला आनंद होत आहे. नव्या भूमिकेत काम करताना मी नव्या उत्साहानं आणि उमेदीनं काम करेन, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
हा प्रवास जवळपास २७ वर्षापूर्वी सुरू झाला होता. अॅमेझॉन केवळ एक विचार होता, तेव्हा त्याचे नवल नव्हतं. त्यावेळी मला विचारण्यात यायचं की, इंटनरनेट काय आहे, आज आपण १३ लाख प्रतिभावान आणि कामाप्रती निष्ठा बाळगणार्या लोकांना रोजगार देत आहोत. जगातील सर्वात यशस्वी कंपनींमध्ये प्रस्थापित झालो आहोत, असं जेफ बेझोस यांनी पत्रात नमूद केलं आहे.