अबुधाबी – आठवड्याभराच्या अंतराने तीन देशांची अवकाशयाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार होती. त्यानुसार, संयुक्त अरब अमिरातीचे (दुबई) ‘होप’ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचत एक इतिहासच रचला आहे. याबरोबरच त्यांनी मंगळ ग्रहाची काही चित्रेही पाठवली आहेत.
युएईच्या अवकाश संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘होप’ ने मंगळ ग्रहाचे अनेक सुंदर फोटो काढले आहेत. यात मंगळाचा पृष्ठभाग सूर्याच्या प्रकाशाने चमकताना दिसतो आहे. या फोटाेंमध्ये मंगळाचा उत्तर ध्रुव आणि सर्वात मोठा ज्वालामुखी ओलंपस मून्सही पहायला मिळतो. मंगळाचे हे फोटो प्रिंस शेख मुहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी टि्वटरवर शेअर केले आहेत.
‘होप’ हे यान मंगळावर सुखरूप पोहोचल्याने मंगळावर जाणाऱ्या देशांमध्ये युएईचा समावेश झाला असून तो पाचवा देश ठरला आहे. तर अरब देशांमध्ये अशी मोहीम राबवून ती यशस्वी करणारा पहिलाच देश आहे. मागच्या मंगळवारी होप यानाने मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला. सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार, युएईचा हा पहिलाच प्रयत्न होता. आणि आपल्या या पहिल्याच प्रयत्ना त्याला यश मिळाले.
गेल्या वर्षी १९ जुलैला या यानाचा प्रवास सुरू झाला होता. या ग्रहावरील वातावरण कसे आहे, धुळीची वादळे कधी येतात, त्याचे कारण काय, तसेच वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी या ग्रहावरील हवामान कसे बदलते, याचा अभ्यास केला जाणार आहे. या मिशनमध्ये मिळालेली माहिती सर्वांना कळावी यासाठी एक वेबसाईटही सुरू करण्यात आली आहे. त्यावर लाँचिंगपासून आजपर्यंतची सगळी माहिती उपलब्ध आहे.
मंगळावरील हवामानाचा मॅप मिळणार
‘होप’ खरंतर एक ऑर्बिटर आहे. सात महिन्यांत जवळपास ३० कोटी मैलाचे अंतर पार करून ते आपल्या ध्येयावर पोहोचले आहे. यामुळे आता मंगळावरील हवामानाचा अंदाज येण्यासाठी याची मदत होईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. येथील संपूर्ण माहिती ‘होप’मुळे उपलब्ध होईल. आणि यामुळे भविष्यात मंगळावर ज्या मोहिमा काढल्या जातील, त्यासाठी ही माहिती मार्गदर्शक ठरेल.