-
कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय
-
अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी
-
सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद
-
खासगी कार्यालयांना घरूनच काम
-
केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु
-
रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी
-
मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन, विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतले
मुंबई – कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.