नवी दिल्ली – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर राजयकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्य सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्राच्या टायमिंगवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परमबीर सिंग पत्र लिहिण्यापूर्वी दिल्लीला गेले होते आणि ते कोणाला भेटले याचा खुलासा लवकरच होईल, असेही मलिक यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सध्या राजीनामा देण्याची गरज नाही, असं पक्षाने ठरवलं आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अनिल देशमुख यांची पाठराखण केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशमुख यांच्याबाबत निर्णय घेतील. परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर लावलेले आरोप गंभीर असून त्याची गंभीर आणि सखोल चौकशी करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले होते.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या आठवड्यात पत्र लिहून देशमुख पोलिस अधिका-यांना प्रत्येत महिन्यात १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगत होते, असा आरोप केला आहे. या आरोपानंतर राज्यात आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. अनिल देशमुख यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
मलिक यांचा दावा
नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं, की परमबीर सिंग यांनी आपली बदली होण्यापूर्वी हे पत्र का जारी केले नाही. सिंग यांनी दावा केला आहे की सचिन वाझे यांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात देशमुख यांची भेट घेतली होती. १५ फेब्रुवारीपर्यंत देशमुख रुग्णालयात दाखल होते. २७ फेब्रुवारीपर्यंत ते गृह विलगीकरणात होते. देशमुख यांनी २८ फेब्रुवारीपासून लोकांना भेटणे सुरू केले. त्यामुळे या पत्रावर शंका उपस्थित होत आहे.