नाशिक – लहान किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या मेडिकलमधून औषधे घेणे बंधनकारक नाही. त्यामुळे ग्राहक कुठूनही औषधे उपलब्ध करुन घेऊ शकतात, असा स्पष्ट खुलासा अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी केला आहे. यासंदर्भातील निर्देश त्यांनी देताच शहरातील बहुतांश हॉस्पिटलमधील मेडिकल दुकानांमध्ये त्यासाठीचा फलक लागला आहे.
हॉस्पिटलमधील मेडिकलमधून औषधांची सक्ती करुन पेशंटच्या नातेवाईकांची लूट सुरू असल्याची तक्रार वारंवार केली जाते. बाहेरुन आणलेली औषधे खपवून घेतली जाणार नसल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगितले जाते. तर, हॉस्पिटलच्या मेडिकलमधून चढ्या दरात औषधे विक्री केली जात असल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना बसत होता. याची दखल घेऊनच अन्न व औषध प्रशासनाने हा खुलासा केला आहे.
दरम्यान, हॉस्पिटलमधीलच मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याची सक्ती करण्यात आली तर यासंबंधी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात (उद्योग भवन, आयटीआय सिग्नल, त्र्यंबकरोड, सातपूर) येथे तक्रार करावी, असे आवाहन, पवार यांनी केले आहे.