नाशिक – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ यावेळेत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र शहरातील लहान-मोठ्या व्यवसायिकांच्या मागणीप्रमाणे आता रात्री ८ पर्यंत दुकाने सुरु राहणारे आहेत. तसेच हॉटेल्स रात्री ९ पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंबंधी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषेदेत माहिती दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरातील लहानमोठ्या व्यावसायिकांच्या मागणीप्रमाणे दुकानांची वेळ रात्री ८ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच शहरातील आणि जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांच्या मागणीप्रमाणे नॉन लिकर हॉटेल सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लिकर हॉटेल सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालू राहतील असे त्यांनी सांगितले. रात्री ९ वाजेनंतर हॉटेलमध्ये कुठल्याही गिऱ्हाईकाला परवानगी दिली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे निर्माण परीस्थितीवर नियंत्रण आणण्यात यश आले असून राज्याच्या तुलनेमध्ये नाशिकचा दर १.७० टक्के आहे. तर रिकवरी रेट हा ८०% पर्यंत पोहोचला आहे अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते.