नाशिक – कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन परदेशातून ते नाशिकला स्वगृही आले खरे पण नियम न पाळल्याने त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल झाला आहे. सिडको परिसरातील आठ जणांना आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहणे बंधनकारक असताना सिडकोत आलेल्या आठ नागरिकांविरोधात अंबड पोलीसात महापालिकेतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून मायदेशी परतल्यावर कोरोनाचा प्रादूर्भाव आणि खबरदारीचा उपाय म्हणून सरकारी आदेशानुसार हॉटेलमध्ये काही दिवस क्वारंटाईन राहणे गरजेचे आहे. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची कोरोना तपासणी केली जाते. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना घरी जाण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र, सिडको परिसरात आलेल्या आठ जणांनी यानियमाचे पालन केले नसल्याची बाब समोर आली आहे. परदेशातून आलेल्या या आठ नागरिकांनी हॉटेलमध्ये न जाता थेट घरी गेले. त्यामुळे महापालिकेचे सिडको विभागाचे विभागीय अधिकारी संदेश शिंदे यांनी अंबड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंबड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसाप सुरू करण्यात आला आहे.