एक अनुभव बळ देणारा….
मित्रांनो, १५ दिवसांपूर्वीच ॲानलाईन पैसे जाण्याची एक घटना आमच्या बरोबर घडली. आम्ही सारे कुटुंब नाशिकच्या एक्स्प्रेस ईन हॅाटेल मधे पार्टीला गेलो होतो . पार्टी माझ्या सासुबाईंच्या वाढदिवसाची होती. हॅाटेलचे बील सासऱ्यांनी त्यांच्या आय.डी.बी.आय. बॅंकेच्या डेबिट कार्ड वरून दिले. कार्ड पी.ओ.एस. मशीन वर स्वाईप करून पासवर्ड टाकल्यावर पैसे अकाऊंट मधून लगेच डेबिट झाले. त्यानंतर साधारण २० मिनीटांनी बॅंकेच्या ए.टी.एम. मशीन मधून १-१ मिनिटाच्या अंतराने रू.१०,०००/- असे ४ वेळा एकूण रू.४०,०००/- गेल्याचा मेसेज मोबाईलवर आला. पैसे दिल्लीच्या नेहरू प्लेस येथील ए.टी.एम. मशीन मधून गेल्याचे ॲानलाईन स्टेटमेंट बघीतल्यावर कळले. पैसे गेल्याचे मेसेज मोबाईलवर आल्यावर ताबडतोब बॅंकेच्या हेल्पलाईनवर कॅाल करून कार्ड ब्लॅाक केले. मी आपला मित्र श्री. विश्वास ठाकूर ह्याच्याशी संपर्क साधला. त्याने तत्परतेने मला सायबर क्राईम डिव्हिजन मधील अधिकारी व एक्सपर्ट श्री. विकास नाईक साहेबांना संपर्क साधण्यास सांगितले. श्री. नाईक साहेबांशी संपर्क साधला. त्यांनी विश्वास चा मित्र म्हणून खुप आदराने व आत्मियतेने वागणूक दिली. त्यांनी खुप चांगले मार्गदर्शन केले. त्यांच्या सल्ल्यानुसार लगेचच ईंदिरानगर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली व दुसऱ्या दिवशी सासऱ्यांच्या बॅंक खात्यातचे स्टेटमेंट , पॅनकार्ड व आधारकार्ड ह्याची प्रत पोलिस स्टेशनला जमा केली व एफ.आय.आर.रिपोर्टची प्रत पोलिस स्टेशनचा शिक्का मारून घेतली. तसेच श्री. नाईक साहेबांच्या सल्ल्यानुसार बॅंकेत जाऊन ॲानलाईन पेमेंट करतांना फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज दिला व तसेच त्यांनी मला आर.बी.आय.ची हि लिंक https://m.rbi.org.in//Scripts/ Complaints.aspx पाठवली व त्यावर सुद्धा कंप्लेंट नोंदवायला सांगितले. त्याप्रमाणे बॅंकेत तक्रार नोंदवली व आर.बी.आय.च्या पोर्टलवर पण तक्रार नोंदवली. आय.डि.बी.आय. बॅंके कडून ५ दिवसात उत्तर आले व त्यांनी ॲानलाईन गेलेले सर्व पैसे शॅडो क्रेडिट म्हणून जमा केले. ते पैसे ९० दिवस काढता येणार नाहीत. पण तसे असले तरी गेलेले पैसे परत मिळाले व मोठे आर्थिक नुकसान होण्यापासून वाचलो हा आनंद आम्हा सर्वांना नक्कीच झाला. नेहमीच सगळ्यांना मदत करणारा आपला परममित्र श्री.विश्वास ठाकूर ह्याच्या मुळेच श्री. नाईक साहेबांची मदत मिळाली. त्याबद्दल विश्वास चे मनापासून धन्यवाद व आभार.
सद्ध्या ॲानलाईन पेमेंट फ्रॅाड खुप वाढले आहेत. डेबिट/क्रेडिट कार्ड चे स्वाईप करणारे मशीन सुद्धा हॅक होत असावे किंवा वयस्कर माणसे पासवर्ड टाकतांना फार काळजी घेत नाहीत. कोणीतरी पाळत ठेवून असतात, कदाचित हॅाटेल मधील कर्मचारी सुद्धा असू शकतो. त्यांचेही रॅकेट शी कनेक्शन असू शकते. माझ्या सासऱ्यांचे गेलेले पैसे परत आले ते केवळ योग्यवेळी श्री. विश्वास ठाकूर ची मदत मिळाली म्हणून मोठ्या संकटातून माझ्या सासऱ्यांना दिलासा मिळाला. आपल्याही सर्वांच्या बाबतीत असा प्रकार घडू नये ह्याकरीता हा मेसेज मी सर्वांनी खबरदारी घ्यावी म्हणून तपशीलवार पाठवत आह. तसे आपल्याला कधीही व काहीही अडचण आली तरी सदैव आपला मित्र श्री. विश्वास ठाकूर आहेच.
धन्यवाद!
विजय लगड, नाशिक.
(श्री विश्वास ठाकूर यांच्या फेसबुक वॉलवरुन जनजागृतीसाठी साभार)