खासदार हेमंत गोडसे यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी
नाशिक ः वैतरणा – गारगाई – कडवा , दमणगंगा – एकदरे हे प्रकल्प शासननिर्णयातून वगळावेत अशी मागणी खासदार
हेमंत गोडसे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
गोडसे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वैतरणा – गारगाई – कडवा – गोदावरी तसेच दमणगंगा – एकदरे हे दोन नदीजोड प्रकल्प नाशिक जिल्हयाचे हक्काचे प्रकल्प आहेत . या दोन प्रकल्पातून बारा टीमसी अधिकचे पाणी उपलब्ध होणार असल्याने सिन्नर तालुक्याचा दुष्काळी तालुका हा कलंक कायमचाच पुसणार आहे . तसेच शहर वासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे . गेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकाने नदीखो – यात जमा होणारे पाणी मराठवाडयात नेण्याचा घेतलेला निर्णय जिल्हावासीयांवर अन्यायकारक आहे . जनभावना लक्षात घेवून सरकारने शासनाच्या निर्णयातून वैतरणा – गारगाई – कडवा आणि दमणगंगा – एकदरे हे दोन प्रकल्प तातडीने वगळावेत अशी आग्रही मागणी आज खासदार हेमंत गोडसे यांनी जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्याकडे केली आहे . नाशिक शहरासह सिन्नर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघावा यासाठी खासदार गोडसे यांचे प्रयत्न सुरू होते . खासदार गोडसे आणि जलसिंचन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी शासनाकडे सततचा पाठपुरावा करून वैतरणा – गारगाई कडवा तसेच दमणगंगा – एकदरे हे दोन नदीजोड प्रकल्प मंजूर करून घेतले . यापैकी दमणगंगा – एकदरे या प्रकल्पातून नाशिक शहरासाठी पाच टीएमसी पाणी तर गारगाई – वैतरणा – कडवा – देव या लिंक प्रकल्पातून सिन्नर तालुक्यासाठी सात टीएमसी पाणी अधिकचे उपलब्ध होणार आहे . या सात टिएमसी पाण्यातून सिंचन , औद्योगिक वापराच्या पाण्यासह दिल्ली – मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोअरचा पाणी प्रश्न सुटणार आहे . खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे या दोन्हीही नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी एक्केचाळीस कोटी रूपये शासनाकडून मंजूर झालेले होते . यातूनच आजमितीस दोन्हीही प्रकल्पांचे सर्वेक्षणही पूर्णत्वास गेलेले आहे . अशातच मागील सरकारने नदीखो – यात जमा होणारे सर्वच पाणी मराठवाडयाला देण्याचा निर्णय घेतल्याने शहरवासीयांमध्ये नाराजीचा आणि चिंतेचा सूर आहे . नदीखो – यातील सर्वच पाणी मराठवाडयाला देण्याच्या शासनाच्या निर्णयातून नाशिक , सिन्नर आणि शिर्डीसाठी सुचविलेले आणि अत्यंत महत्वाचे असलेले वैतरणा – गारगाई – कडवा , दमणगंगा – एकदरे हे दोन नदीजोड प्रकल्प वगळावेत अशी आग्रही मागणी आज खासदार हेमंत गोडसे यांनी जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्याकडे केली आहे . याप्रसंगी आमदार हिरामण खोसकर , माजी खासदार समीर भुजबळ , देविदास पिंगळे , माजी आमदार जयंत जाधव , जलसिंचन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते