नवी दिल्ली – प्रवाशांना विविध प्रकारच्या सुविधा देऊन त्यांचा प्रवास सुखाचा करण्याचा विडाच जणू रेल्वेने उचललेला दिसतो. म्हणूनच विमानतळाच्या धर्तीवर तशाच सुविधा असलेले एक टर्मिनस रेल्वेने बंगळुरू येथे तयार केले आहे.
आता फक्त याचे उद्घाटन होणे बाकी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी याचे फोटो शेअर करत ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने देखील यापूर्वी याचे फोरो शेअर केले होते.
एस एम विश्वेश्वरय्या टर्मिनस असे याचे नाव असून बेंगळुरू विमानतळाच्या धर्तीवर त्याची रचना करण्यात आली आहे. ४२०० चौरस मीटर एवढा विस्तार असलेल्या या टर्मिनससाठी ३१४ कोटी एवढा खर्च आला आहे. या टर्मिनसचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णपणे वातानुकूलित आहे. म्हणजे या टर्मिनसला सेन्ट्रलाईज्ड एसी आहे.
हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असले तरी रेल्वेचा हाच दावा आहे. याशिवाय आणखी एक खास गोष्ट म्हणजे, विमानतळाप्रमाणे येथे व्हीआयपी लाऊंज आहे, जे एकदम लक्झुरियस आहे. यासोबतच, डिजिटल रिअल टाइम पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीमही आहे.
याशिवाय प्रवाशांसाठी वेटिंग रूमही आहे. येथे खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ४ लाख लीटरचा जल पुनर्भरणाचा (वॉटर रिसायकलिंग) प्लांट आहे.
येथे सात प्लॅटफॉर्म, २ भुयारी मार्ग आणि १ पूल आहे. हा पूल सर्व प्लेटफॉर्म्सना जोडणारा असेल. याशिवाय ज्येष्ठांचा विचार करून येथे लिफ्ट आणि सरकत्या जिन्यांची सोयही करण्यात आली आहे. ही सोय सर्व प्लॅटफॉर्म्सना असेल.
येथून जवळपास ५० गाड्यांची ये-जा सुरू राहिल, असे रेल्वेचे म्हणणे आहे. या टर्मिनसवर पार्किंगचीही व्यवस्था उत्तम आहे. रेल्वेचा दावा खरा मानायचा तर येथे २५० गाड्या, ९०० दुचाकी, ५० रिक्षा, बेंगळुरू परिवहनच्या ५ बस आणि २० टॅक्सीची व्यवस्था आहे.
थोडक्यात, प्रवाशांना ज्या ज्या गोष्टींची गरज असते, त्या सगळ्याची काळजी येथे घेण्यात आलेली आहे. आता हे टर्मिनस कधी सुरू होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.