मुंबई – अंटार्क्टिकाच्या जवळ असलेल्या ब्रिटीश बेटांवर मोठे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण आहे जगातील सर्वांत मोठा आईसबर्ग किंवा हिमपर्वत. हा आईसबर्ग १ ट्रीलियन टन वजनाचा आहे. युरोपीयन स्पेस एजन्सी (ईएसए) च्या मते हा आईसबर्ग १२ जुलै २०१७ या दिवशी अंटार्क्टिकाच्या विशाल लार्सन सी आईसशेल पासून वेगळा झाला होता. त्यानंतर सहा महिन्यांत हा आईसबर्ग साउथ अटलांटीकच्या दक्षिणेला पहिला गेला. एजन्सीच्या मते या आईसबर्गने आजवर १०५० किलोमीटरचा प्रवास केला आहे. या दरम्यान त्याचे अनेक तुकडे सुद्धा झाले, मात्र, तरीही त्याच्या आकार महाकाय असल्याचे वैज्ञानिक सांगतात.
या आईसबर्गवर सेन्टीनल-१ नामक एका उपग्रहाद्वारे सतत लक्ष ठेवले जात आहे. याचे कारण म्हणजे आजवर जगात नोंद झालेल्या सर्वाधिक विषाय आईसबर्ग असलेल्या ‘लक्जएमबर्ग’ पेक्षा हा आईसबर्ग दुप्पट आकार आणि वजनाचा आहे. याचे नाव ए-६८ असे ठेवले गेले आहे. कालानुरूप वेगळ्या झालेल्या याच्या प्रत्येक भागाला वैज्ञानिक ए,बी,सी. अश्या पद्धतीने नावे देत आहेत. जुलै २०२० मध्ये प्रस्तुत आईसबर्गचा जन्म होऊन तीन वर्षे झाल्यानंतर उपग्रहाद्वारे याचे स्थान एलीफंट आईसलँडपासून काही दूर पर्यंत असल्याचे निदर्शनास आले होते.
वैज्ञानिकांच्या मते हा आईसबर्ग दक्षिण जॉर्जिया आणि सँडविच बेटांच्या दिशेने पुढे येतो आहे. जर आईसबर्ग या बेटांवर येऊन आदळला तर या बेटांवर असलेल्या हजारो पेंग्विन आणि सील माश्यांच्या रहिवासाला धोका उत्पन्न होईल. याचे कारण म्हणजे या आईसबर्गचा विशालकाय आकार आणि जवळपास २०० मीटर खोली. मात्र हा आईसबर्ग खरोखरच या बेटांना येऊन धडकणार किंवा नाही हे येत्या काही काळात स्पष्ट होईल. ईएसएच्या मते आजपर्यंत पाच मोठ्या आईसबर्गस बद्दल माहिती उपलब्ध आहे त्यापैकी हा सर्वांत मोठा आईसबर्ग आहे. यापासून वेगळा झालेला एखादा भाग जरी एखाद्या जहाजावर आदळल्यास त्या जहाजाची गत ही टायटॅनिक सारखी व्हायला वेळ लागणार नाही. वैज्ञानिकांच्या मते सँडविच बेटांच्या अवतीभवती पाण्याचे तापमान अधिक असल्यामुळे हा आईसबर्ग बेटांवर येऊन आदळण्याआधी वितळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.