काशी – प्रत्येक तीर्थस्थळाचे एक वैशिष्ट्य असते. कथा, दंतकथा आणि परंपरांच्या पलीकडे एतिहासिक, पुरातत्विय वैशिष्ट्यांकडे पर्यटक म्हणून बघायला प्रत्येकालाच आवडत असते. महादेवाची नगरी म्हणून ओळखली जाणारी काशीदेखील काही अत्यंत आकर्षक रचनांच्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरांच्या रचनांमध्ये अनेक रहस्यही दडलेली आहेत. असेच जवळपास ५०० वर्ष जुने मंदिर भाविकांना, पर्यटकांना भुरळ घालत असते.
नऊ अंशांनी झुकलेले
येथील सिंधिया घाटावर असलेले रत्नेश्वर महादेव मंदिर पाचशे वर्ष जुने असून ते नऊ अंशांनी झुकलेले आहे. लॉस्ट टेंपल या संस्थेने अलीकडेच ट्वीटरवर या मंदिराचे छायाचित्र पोस्ट केले होते. त्यासोबतच हे मंदिर कुठे आहे, असा प्रश्नही विचारला होता. त्यावर चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे काशीचे रत्नेश्वर महादेव मंदिर आहे, असे उत्तर दिले होते. देशाच्या पंतप्रधानांनी उत्तर दिल्यामुळे हे मंदिर जगभरात चर्चेला आले. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत इटली येथील विश्वविख्यात पिसा येथील मिनारचा उल्लेख आहे. कारण हे मिनार चार अंशांनी झुकलेले आहे. पण काशीचे रत्नेश्वर मंदिर त्याहीपेक्षा पाच अंशांनी जास्त म्हणजे नऊ अंशांनी झुकलेले आहे. गंगेच्या प्रवाहाच्या विरुद्ध मणिकर्णिका घाटाच्या दिशेने आपल्या अक्षांवर नऊ अंशांनी झुकलेले आहे.
वास्तुकलेचा उत्तम नमुना
हे मंदिर वास्तूकलेसोबत नागर शैलीतील सर्वोत्तम कलाकृतीपैकी एक आहे. ते गुजरातच्या सोलंकी वंशातील मंडळींनी तयार केलेल्या मंदिरांशी मिळतेजुळते आहे. वाराणसी येथी हिंदू विद्यापीठात कला व इतिहास विभागाचे प्रो. अतुल त्रिपाठी सांगतात की, १८३४ मध्ये ब्रिटनचे प्रसिद्ध चित्रकार विल्यम्स डेनियल यांनी वाराणसी यात्रेदरम्यान रत्नेश्वर महादेव मंदिराचे चित्र काढले होते. त्यात मंदिराचा कळस झुकलेला दाखविण्यात आला आहे. तसेच रॉबर्ट एलियट यांनी १८२४ मध्ये काढलेल्या चित्रात दोन मंदिरांचे कळस झुकलेले दाखविण्यात आले आहे. यावरून एक मंदिर गंगेत बुडाले असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रदक्षिणा मार्ग नाही
या मंदिराला प्रदक्षिणा मार्ग नाही. तर मंदिराच्या गर्भागृहात छोटे छोटे शिखर तयार केलेले आहेत. मंदिराचा घुमट गुजरातच्या वास्तूकलेचे दर्शन घडविणारा आहे. त्यामुळे मंदिर तयार करणारे कारागिर गुजरातहून आले असावेत, असा अंदाज आहे.
दंतकथांमध्ये उल्लेख
मंदिराच्या निर्माणासंदर्भातत दोन दंतकथादेखील उबलब्ध आहेत. एका दंतकथेनुसार, राजा मानने आपली माता रत्नाबाईसाठी हे मंदिर तयार केले होते. या माध्यमातून त्याला आईप्रती ऋण व्यक्त करायचे होते. त्यामुळे मंदिर मागच्या बाजुला झुकले, कारण आईचे ऋण कधीच फेडता येत नाही, अशी एक दंतकथा आहे. त्यामुळे याला मातृ ऋण मंदिरही म्हणतात. दुसरी दंतकथा म्हणते की अहिल्याबाईची दासी रत्ना हिने ऋण घेऊन हे मंदिर तयार केले आणि त्याला स्वतःचे म्हणजे रत्नेश्वर महादेव मंदिर असे नाव दिले. त्यानंतर श्राप मिळाला की या मंदिरात दर्शन-पुजन होणार नाही.