नवी दिल्ली – देशातील पोलिसांना अधिक परिणामकारकरीत्या त्यांचे काम करण्यासाठी उत्तेजन मिळावे आणि कार्यक्षमतेबाबत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण व्हावी या उद्देशाने भारत सरकार दरवर्षी देशभरात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पोलीस ठाण्यांची यादी जाहीर करत असते. पोलीस ठाण्यांची श्रेणी निश्चित करण्यासाठी काही मापदंड ठरविले जावे आणि पोलीस ठाण्यांच्या कामाचा अभिप्राय लक्षात घेऊन त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जावे असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये कच्छ इथे सन 2015 मध्ये भरलेल्या पोलीस महासंचालकांच्या परिषदेला संबोधित करताना दिले होते. त्या निर्देशांना अनुसरून ही यादी तयार केली जाते.
सर्वोत्तम पोलीस ठाण्यांची नावे निश्चित करण्यासाठी या वर्षी केंद्रीय गृह मंत्रालयाने आव्हानात्मक परिस्थितीमध्ये पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचे सर्वेक्षण केले. कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी हालचालींवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे या वर्षी दुर्गम भागातील पोलिस ठाण्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. त्यामुळे सरकारने याबाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्वेक्षण करण्यात आले.
हे आहेत टॉप टेन पोलिस स्टेशन्स
(पोलिस स्टेशन आणि राज्य)
१. नॉन्गपोकसेकमाई – मणिपूर
२. सुरामंगलम – तामिळनाडू
३. खरसंग – अरुणाचल प्रदेश
४. झिलमिल – छत्तीसगढ
५. संलगुअम – गोवा
६. कालिघाट – अंदमान निकोबार
७. पाकयोंग – सिक्कीम
८. कान्थ – उत्तर प्रदेश
९. खानवेल – दादारा नगर हवेली
१०. जमैकुंटा – तेलंगाणा
देशातील हजारो पोलीस ठाण्यांमधून चाळणी प्रक्रियेनंतर निवड झालेल्या सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमधील बहुतांश पोलीस ठाणी छोट्या शहरांमधील किंवा ग्रामीण भागातील आहेत असे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी सांगितले आहे. गुन्ह्यांना आळा घालून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी साधनांची उपलब्धता महत्त्वाची असली तरी आपल्या पोलिसांचा प्रामाणिकपणा आणि कामाप्रती समर्पणाची भावना जास्त महत्त्वाची आहे असे मत शहा यांनी व्यक्त केले.
उपलब्ध माहितीचे विश्लेषण, प्रत्यक्ष निरीक्षण आणि जनतेकडून मिळालेल्या अभिप्रायांच्या मदतीने देशातील 16,671 पोलीस ठाण्यांपैकी सर्वोत्तम अशी 10 पोलीस ठाणी निवडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. प्रत्येक राज्यातील एकूण ठाण्यांपैकी उत्तम कामगिरी करणाऱ्या काही पोलीस ठाण्यांची निवड करताना खालील गुन्ह्यांबाबत केलेल्या कार्यवाहीचे निकष लावण्यात आले:
- मालमत्तेच्या वादासंदर्भातील गुन्हे
- महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे
- समाजातील दुर्बल घटकांविरोधातील गुन्हे
- हरविलेल्या व्यक्तींचा शोध, सापडलेल्या अनोळखी व्यक्ती आणि ओळख न पटलेले मृतदेह यांच्यासंदर्भातील पुढील कार्यवाही
यातील शेवटचा निकष यावर्षी समाविष्ट करण्यात आला आहे
सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक राज्यातून निवडण्यात आलेल्या काही पोलीस ठाण्यांचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे:
- ज्या राज्यांत 750 पेक्षा जास्त पोलीस ठाणी आहेत अशा प्रत्येक राज्यातून प्रत्येकी 3
- इतर सर्व राज्ये आणि दिल्ली यांच्यातून 2
- प्रत्येक केंद्रशासित प्रदेशातून प्रत्येकी 1
अशा प्रकारे निवड प्रक्रियेच्या पुढच्या पायरीसाठी 75 पोलीस ठाण्यांची निवड झाली.
अंतिम टप्प्यात 19 मानकांच्या कसोटीवर तत्पर सेवा आणि कामाचा दर्जा उंचावण्यासाठी नव्या तंत्रांचा उपयोग यांच्यासंदर्भात निष्कर्ष, पोलीस ठाण्यांमधील पायाभूत सुविधा, पोलिसांची उपलब्धता आणि त्या त्या पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेतील नागरिकांचे अभिप्राय तपासण्यात आले.
महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीत देखील या वर्षीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी देशातील सर्व पोलीस ठाण्यांनी सक्रीय सहभाग नोंदवत उत्तम सहकार्य केले. या वार्षिक मूल्यमापनातून आपल्या पोलीसांच्या मेहनतीचा सन्मान होतो, पोलीस दलाला उत्तेजन मिळते आणि भविष्यकाळात देशातील पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कामाचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक अभिप्राय मिळतात. तसेच यातून पोलीस ठाण्यांमधील सुविधांची, साधनांची उपलब्धता आणि कमतरता याविषयीचे चित्र स्पष्ट होते. पोलीस ठाण्यांच्या मूल्यमापनाचा हा उपक्रम पोलीस सेवेमध्ये उत्तम सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शकाचे काम करतो.