मुंबई – सोशल मिडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल झाली आहे ती म्हणजे ‘हेल्मेट नसल्यास १ हजाराचा दंड; खड्डे न बुजवणाऱ्यांना किती?’ मुंबईच्या विवेक गाडे यांनी ही पोस्ट टाकली असून त्याद्वारे सर्वसामान्यांच्या प्रश्नाला त्यांनी वाचा फोडली आहे. त्यामुळेच ती अल्पावधितच लोकप्रिय झाली आहे.
पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडतात. आणि नागरिकांना वेगवेगळ्या समस्येला सामोरे जावे लागते अशातच मुंबईच्या विवेक गाडे यांनी मुंबईच्या रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्यांसोबत फोटो काढून एक नवाच प्रश्न विचारला आहे. की हेल्मेट न घातल्यास सरकार १ हजार रुपये दंड घेत असेल तर रस्त्यावरील खड्डे न बुजवणाऱ्या सरकारला किती दंड द्यायला हवा? एकूणच हा प्रश्न विचार करण्यासारखा असून सरकारचे डोळे उघडायला लावणारा आहे.
रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे ही दुर्दशा होत असून या रस्त्यांवर होणारे अपघातही मोठया प्रमाणावर वाढले आहेत. संबंधित ठेकेदारांना वेळीच उपाय योजना करण्यास सांगून या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सरकारने करायला हवी असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. गाडे यांनी शेअर केलेले फोटोही अतिशय बोलके आणि सद्यस्थिती दर्शविणारे आहेत.