नवी दिल्ली – हेल्मेट वापराच्या नियमात आता बदल करण्यात आले असून यापुढे वजनाने हलके असलेले हल्मेट वापरता येणार आहेत. हा नियम बदलल्याने हेल्मेटच्या विक्रीत तसेच वापरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.
केंद्र सरकारच्या वतीने देशात फक्त बीएआयएस हेल्मेटला मानक जाहीर करण्यात आले आहे. अनेक विक्रेते कोणत्याही प्रकारच्या हेल्मेटची विक्री करतात आणि त्यांचा दर्जा चांगला नसतो. यापुढे दर्जा नसलेली हेल्मेट विक्री करता येणार नाही. हेल्मेट खरेदी करताना योग्य तपासणी करणे अपेक्षित असते. आता राजमार्ग मंत्रालयाने तज्ज्ञांच्या समितीने दिलेल्या सूचना स्वीकारल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय स्तरावरील सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
देशात दरवर्षी कमी दर्जाच्या हेल्मेटची दुप्पट विक्री होते, कारण मोठ्या संख्येने वाहनचालक त्याला पसंती देतात. सुप्रिम कोर्टच्या आदेशानंतर स्थापन समितीच्या अहवालानंतर तज्ज्ञांनी एम्समधील डॉक्टरांबरोबर चर्चा करून वजनाने हलक्या (कमी) हेल्मेटच्या वापरला देशभरात परवानगी देण्यात आली आहे. सध्या हलक्या वजनाचे हेल्मेट बांधकामाच्या ठिकाणी वापरण्यात येते.