इंडिया दर्पण विशेष
नाशिक – येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मधील हेरगिरी प्रकरणी हवाई दलानेही चौकशी सुरू केली आहे. एचएएलच्या आवारालगतच असलेल्या हवाई दल केंद्राने (११ बीआरडी) या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. हवाई दलातील विमानांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे हे देशातील मोठे केंद्र आहे. याठिकाणी मिग आणि सुखोई या विमानांची देखभाल-दुरुस्ती केली जाते.
एचएएलचा कर्मचारी दीपक शिरसाठ हा हेरगिरी प्रकरणात सापडल्याने हवाई दल केंद्रानेही चौकशी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. आपल्या आवारातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. शिरसाठ हा या केंद्रात येऊन गेला होता की काय, याची तपासणी तसेच केंद्राच्या गेटवर नोंदविल्या जाणाऱ्या पुस्तिकेची छाननी सुरू करण्यात आली आहे. शिरसाठने गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय या संघटनेला पुरविल्याचा मोठा संशय आहे. यासंदर्भात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) कसून चौकशी करीत आहे. मात्र, शिरसाठ हवाई दल केंद्र किंवा परिसरात आला होता का, आला असेल तर तो कुठे गेला, कसा गेला यासह अन्य बाबींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. शिरसाठच्या ओळखीचे किंवा त्यांना सतत भेटणाऱ्यांमध्ये केंद्रातील कुणी कर्मचारी आहे का, तो कुणाच्या संपर्कात होता, अशा विविध बाबींची पडताळणी केली जात आहे. तसेच, या केंद्राची सुरक्षा व्यवस्थाही अतिशय कडक करण्यात आली आहे. हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याची दखल घेतली असून या चौकशीचा अहवाल हवाई दल मेन्टेनन्स कमांड (नागपूर) येथे तातडीने सादर केला जाणार असल्याचे समजते.
यासंबंधी आणखी वाचा