नाशिक – ओझर येथील हिंदुस्थान अॅरोनॅटिक्स लिमीटेड (एचएएल) कंपनीत हेरगिरीचा प्रकार समोर आल्यानंतर आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल व अन्य सामुग्री फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्याचे विश्लेषण सध्या सुरू आहे. फॉरेन्सिकचा हा अहवालच हेरगिरी प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. त्यामुळे त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
एटीएसचे पथक एचएएलमध्ये
संशयित आरोपी दीपक शिरसाठ याची कसून चौकशी सुरू आहे. एचएएलमध्येही एका पथकाने तळ ठोकला आहे. शिरसाठ सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी सध्या केली जात आहे. शिरसाठ काम करीत असलेला विभाग, तेथील कागदपत्रे यांची पडताळणी पथकाने केल्याचे समजते. एटीएसच्या पथकाकडून कंपनीतील परिचीतांकडून माहिती संकलीत केली जात असल्याचे बोलले जाते.
वरिष्ठांकडून तपास
मुंबईतील एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हेरगिरी प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतल्याचे समजते. त्यामुळेच .ा प्रकरणाची अतिशय सखोल चौकशी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच या प्रकरणातील गांभिर्यही वाढतच चालल्याचे सांगितले जात आहे.
तपासाची दिशा अशी ठरणार
शिरसाठने नक्की काय माहिती पुरविली, हे समोर आणण्यासाठी एटीएसचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या शिरसाठ या घटनेतील प्रमुख संशयीत असल्याने त्याचे पाकिस्तान कनेक्शनचा उलगडा करण्यासाठी एटीएसने त्याच्या साथीदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. शिरसाठ कडून तीन मोबाईल, पाच सीमकार्ड, दोन मेमरीकार्ड असा संशयास्पद मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यातील माहिती संकलीत करण्याचे काम एटीएसने हाती घेतले आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाच्या तात्रिक अहवालानुसार तपासाची दिशा ठरविली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.