मुंबई – अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी पुढील निवडणूक २०२४ मध्ये होणार आहे. मात्र या पदासाठी दावेदारांची चर्चा आत्तास सुरू झाली आहे. अमेरिकेच्या विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस पुढील निवडणूक जिंकू शकतात, असा दावा ब्रिटनची सट्टा कंपनी लॅडब्रोक्सने केला आहे.
विशेष म्हणजे याच कंपनीने निवणूक जिंकण्याच्या दृष्टीने विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोघांपेक्षा कमला हॅरिस यांना विशेष पसंती असेल, असेही म्हटले आहे. त्यासाठी त्यांच्या विजयाच्या शक्यतेची २२ टक्के खात्रीही त्यांनी दिली आहे.
लॅडब्रोक्सनुसार, २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमला हॅरिसची विजयाची शक्यता २२.२, जो बायडेन यांची २० आणि ट्रम्प यांनी १४.३ टक्के शक्यता आहे. गेल्यावर्षी ३ नोव्हेंबरला झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना बायडेन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. याच निवडणुकीत ५६ वर्षीय कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्या होत्या. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष आहेत.
ट्रम्प २०२४मध्ये लढू शकतात
व्हाईट हाऊस सोडल्यानंतर ट्रम्प यांनी केलेल्या पहिल्या जाहीर भाषणात २०२४ ची निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते. त्याचवेळी त्यांनी आपल्या रिपब्लिकन पार्टीला एकजूट होण्याचे आवाहनही केले होते.
बायडेन यांच्या प्रशासनावर टिका करताना अवघ्या एक महिन्यात बायडेन यांचा कार्यकाळ अमेरिका फर्स्ट ते अमेरिका लास्ट येथपर्यंत येऊन पोहोचला आहे. ७४ वर्षांचे ट्रंप यांनी फ्लोरिडामध्ये कंझर्वेटीव्ह पॉलिटिकल एक्शन कमिटीच्या परिषदेत २०२४च्या निवडणुकीच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे संकेत दिले आहेत.
व्हाईट हाऊसमध्ये परतणार
या वार्षिक संमेलनात त्यांनी ‘आम्ही व्हाईट हाऊसमध्ये परतणार‘ या शब्दांत आपल्या समर्थकांना विश्वास दिला. ट्रम्प यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची बातमी खोटी असल्याचे सांगितले. अश्याने तर आमच्या पक्षाचे मतदार विभागले जातील, असे ते म्हणाले.