नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षा समाप्त झाल्या आहेत. सदर परीक्षा दि. 08 सप्टेंबर ते दि. 03 ऑक्टोबर कालावधीत अयोजित करण्यात आल्या होत्या. सदरील परीक्षेत वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, समचिकीत्सा, परिचर्या, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष विज्ञान आदी विषयांचा समावेश होता.
याबाबत माहिती देतांना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित गजानन पाठक यांनी सांगितले की, पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेस विद्यार्थ्यांची उपस्थिती 95 टक्के इतकी होती. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मास्क परिधान केले होते. राज्यातील 270 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षा केंद्रंावर सोडिअम हायपोक्लोराईड सोल्यूशन व लिक्विड सॅनिटाईझाारचा वापर करण्यात आला. विद्यापीठाकडून सदरील परीक्षेचे सी.सी.टी.व्हि. यंत्रणेद्वारे निरीक्षण करण्यात आले. प्रत्येक पेपर नंतर एका दिवसाचा खंड देण्यात आला होता.
ते पुढे म्हणाले की, सदर परीक्षेसाठी 9546 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज सादर केले होते. लेखी परीक्षा झाल्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षेचे विद्यापीठाकडून आयोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय, दंत, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष विज्ञान विद्याशाखांच्या प्रात्यक्षिक परीक्षा समाप्त झाल्या आहेत. तसेच आयुर्वेद, समचिकीत्सा, परिचर्या आदी विद्याशाखांच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहिर केले आहेत. सदरील परीक्षा विद्याशाखानिहाय दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहेत. वैद्यकीय विद्याशाखेच्या द्वितीय व तृतीय वर्ष, बी.पी.एम.टी. सर्व वर्ष अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा दिनांक 26 ऑक्टोबर ते दि. 09 नोव्हेंबर 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आधुनिक मध्यमस्तरीय सेवा प्रदाता (Modern Midlevel Service Provider Course) विषयाची लेखी परीक्षा दिनांक 19 ते 21 नोव्हेंबर 2020 या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
दंत, आयुर्वेद, समचिकीत्सा, परिचर्या, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष विज्ञान आदी अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष पदवी विषयांच्या लेखी परीक्षा दिनांक 21 नोव्हेंबर ते दि. 14 डिसेंबर 2020 कालवधीत तर सन 2019 प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिनांक 07 ते 18 डिसेंबर 2020 कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सदरील सर्व परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाचे संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून जाहिर करण्यात आलेल्या धोरणानुसार विद्यापीठाकडून सदर परीक्षांचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर परीक्षा संबंधीत कामकाज यशस्वी करण्यासाठी मा. कुलगुरु यांचे मार्गदर्शन तसेच, विद्यापीठाचे उपकुलसचिव महेंद्र कोठावदे, विजय जोंधळे, रत्नाकर काळे, विजय सोनवणे, श्रीमती चंदा भिसे, श्रीमती ज्योती इटनकर यांनी परिश्रम घेतले आहेत.