नाशिक – शहरातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, यातच आता दिलासादायक वृत्त समोर आले आहे. ऑगस्ट महिन्यात २१ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये कोरोनाचा संसर्ग हा ४६ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचला होता. परंतु तरुणांमधील वाढत्या जागरुकतेमुळे हा दर ३८ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे शहरातील तरुण अधिक सजग झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
युवकांमधील उच्च संसर्गाचे प्रमाण हे महानगरपालिकेसाठी मोठी समस्या झाली होती. मात्र, दोन महिन्यांनंतर तरुणवर्गात कोरोनाच्या संसर्ग दरात लक्षणीय घट झाली आहे. परंतु ४१ ते ६० वर्षे वयोगटातील रुग्णांचा संसर्ग दर ऑगस्टमध्ये २.८ वरून आता वाढून ३६ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.
कोरोनासारख्या साथीच्या रोगाला तरुण मंडळी गंभीरपणे घेत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी संसर्ग दर वाढला होता. परंतु, दिवसेंदिवस वाढत असलेली जागरूकता पाहता परिस्थिती बदल झाला आहे. तसेच, मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळल्यास महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन कार्यवाही करत आहेत.