टी२० मध्ये षटकाराचे स्थान अतिशय मोठे आहे. एका चेंडूत सर्वाधिक धावा जमवून देणारा हा फटका किक्रेटच्या टी -२० या फॉर्मटमध्येच सर्वात जास्त मारला जातो. या फटक्याचा वापर ख्रिस गेलने त्याच्या संपुर्ण टी – २० कारकिर्दीत १००० वेळा करून दाखवला. याला पराक्रम हा शब्द कदाचित कमी पडेल कारण हा महापराक्रम आहे. वेस्ट इंडीज कडून टी – २० खेळण्याखेरीज आणि आयपीएल खेरीज ख्रिस गेल जगभरात होण्या–या टी -२० लीग मॅचेसमध्ये खेळत असतो. या सर्व सामन्यात मिळून त्याने केलेला हा पराक्रम त्याच्या “युनिव्हर्स बॉस” या नावाला साजेसा आहे. शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाब संघासमोर ९९ धावांची धुवांधार फलंदाजी करतांना त्याने तब्बल ८ षटकार खेचून आयपीएलच्या सर्व सिझनमध्ये ३४९ वा षटकार पुर्ण केला आणि टी – २० कारकिर्दीतला १००० वा. आयपीएलमध्ये देखील सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्याच नावावर आहे. आता त्याचा हाच वैयक्तीक विक्रम त्याने आणखी एका मोठया शिखरावर ठेवून ठेवला आहे.
ख्रिस गेल २००९ पासून आयपीएल स्पर्धा खेळतोय. या क्रिकेटचा “युनिव्हर्स बॉस” अशी ओळख असलेल्या गेलने आत्तापर्यन्त १३१ आयपीएल सामने खेळले असून त्यात ४१.३९ च्या सरासरीने ४७६० इतक्या धावा केल्या आहेत. त्यात ६ शतकं आणि ३० अर्धशतकं आहेत. ३८४ चौकार आणि ३४९ षटकार हे त्याच्या भात्यातले खास घणाघाती फटके यात सामील आहेत. त्याच्या खालोखाल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार खेचणा–यांच्या यादीत ए.बी.डिव्हीलीयर्सचे नाव असून त्याने २३१ षटकार मारले आहेत. आयपीएलमध्ये एका सामन्यात सर्वाधिक नाबाद १७५ धावांचा वैयक्तीक विक्रम देखील या बॉसच्याच नावावर आहे हे नमुद केल्याशिवाय गेलच्या षटकार सम्राटपदाची महती संपणार नाही.