जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा जीव अखेर भांड्यात पडला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आज (१४ ऑगस्ट) विधीमंडळात बहुमत सिद्ध केले आहे. आवाजी मतदानाने झालेल्या विश्वासदर्शक ठराव गेहलोत सरकारने जिंकला आहे. त्यामुळे राजस्थानातील सत्तासंघर्ष आणि दोलायमान स्थिती संपुष्टात आली आहे.
२०० जागा असलेल्या राजस्थानच्या विधानसभेत काँग्रेसचे १०७ आमदार आहेत. त्यांना इतरांचाही पाठिंबा आहे. भाजपाच्या ७२ जागा आहेत. गेल्या काही दिवसापासून राजस्थानमध्ये मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला होता. काँग्रेस नेते सचिन पायलट यांची समजूत काढण्यात आल्याने काँग्रेसमध्ये समेट झाला आहे. त्यामुळे येथील काँग्रेस सरकार स्थिर झाले आहे. दरम्यान, विधीमंडळाचे कामकाज येत्या २१ ऑगस्टपर्यंत संस्थगित करण्यात आले आहे.