आग्रा – कोरोना प्रादुर्भावामुळे बहुतांश पर्यटनस्थळ बंद ठेवण्यात आले होते. परंतु अनलॉक ४ च्या प्रक्रियेत आजपासून अनेक गोष्टी सुरु करण्यात येणार आहेत. याअंतर्गत तब्बल १८८ दिवसानंतर ताजमहाल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे १७ मार्चपासून ताजमहाल तसेच आग्र्याचा किल्ला बंद होता. मात्र शासनाच्या नियमानुसार एका दिवशी ताजमहालमध्ये फक्त पाच हजार पर्यटक तर आग्र्याच्या किल्ल्यात २५०० पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. दोन्ही ऐतिहासिक स्थळावर तिकिट काउंटर बंद राहणार असून पर्यटकांनी ऑनलाईन तिकीट बुक करावे असे अधिकृत संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले आहे. यादरम्यान पर्यटकांना मात्र सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. लाखोंच्या संख्येने दररोज येणाऱ्या पर्यटकांवर निर्बंध लागले असून आता फक्त पाच हजार पर्यटकांना प्रवेश दिली जाणार आहे. नविन नियमावलीनुसार शाहजहान आणि मुमताजच्या मुख्य कबरी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एकावेळी फक्त पाच पर्यटकांना जाण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे संग्रहालय देखील पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. अधिकृत परवाना असलेल्या गाईडला स्मारकात प्रवेश दिला जाणार आहे. हस्तशिल्प स्मारक ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे.
—
असे बुक करा ऑनलाईन तिकीट…
पर्यटकांना एएसआयच्या वेबसाईटवरून तिकिट बुक करावे लागणार आहे. तिकिटावरील क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. मुख्य तिकीट घर बंद ठेवण्यात येणार असल्याने पार्किंगसह संपूर्ण सुविधांचे तिकीट पर्यटकांना ऑनलाईन बुक करावे लागणार आहे. https://www.asiagracircle.in या वेबसाईटला भेट देऊन पर्यटकांना तिकीट बुक करता येणार आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांनां ग्रुपफोटो काढण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
—
पर्यटकांना मास्क अनिवार्य…
पर्यटकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्याचबरोबर मास्क लावणे अनिवार्य आहे. तसेच वापरून झालेल्या पाण्याची बॉटल, टिश्यू पेपर आदी कचरापेटीत टाकावे. स्मारकात प्रवेश करण्यापूर्वी पर्यटकांची थर्मल स्क्रीनिंग केली जाणार आहे. ज्या पर्यटकांना कोणतेही लक्षणे नाहीत केवळ त्यांचा ताजमहालच्या परिसरात प्रवेश दिला जाणार आहे.