नाशिक – हुंड्याच्या रकमेपोटी पत्नीचा मानसिक व शारिरीक छळ करून तिच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या पतीला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. एस. नायर यांनी हे आदेश दिले आहेत. टाकळी परिसरातील समतानगर भागात २०१६ मध्ये ही घटना घडली होती.
विक्रम अर्जुन पवार (रा. समतानगर, टाकळी) हा पत्नी सोनाली हिस खुप त्रास देत होता. २५ मे २०१६ रोजी सोनालीचा मृत्यू झाला. माहेरकडील मंडळीने दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नात ठरलेली हुंड्याची २५ हजार रुपये माहेरून आणावेत, यासाठी विक्रम हा सोनालीकडे आग्रह करायचा. त्यानंतर त्याने तिला मारहाण व छळ सुरू केला. २५ मे रोजी याच कारणातून पवार दाम्पत्यात वाद झाला. यावेळी विक्रमने सोनालीला मारहाण केली. तसेच, सोनालीला भिंतीवर लोटले. या दुर्घटनेत सोनालीला गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. या गुन्ह्याचा तपास उपनगरचे तत्कालिन उपनिरीक्षक एम. व्ही. शिंदे यांनी केला. तसेच दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकार तर्फे अॅड. रेवती कोतवाल यांनी काम पाहिले. या खटल्यात आरोपीवरूध्द फिर्यादी, साक्षीदार आणि पंच यांनी दिलेले साक्ष व पुरावे ग्राह्य धरण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने भादवी कलम ३०४ अन्वये दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा विक्रमला सुनावली.