लंडन – उत्तर आयर्लंडमधील ९० वर्षीय मार्गरेट किनन या जगातील सर्वात नशिबवान महिला ठरल्या आहेत. जगातील सर्वात पहिली कोरोना लस घेण्याचा मान त्यांना मिळाला आहे. ब्रिटन सरकारच्यावतीने लसीकरणास प्रारंभ करण्यात आला असून सर्वात पहिली लस मार्गारेट यांना देण्यात आली आहे. कशी अधिकत माहिती ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी दिली आहे.
जगभरात कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. फायझर बायोटेकने विकसित केलेल्या लसीचे सर्वसामान्यांसाठी वितरण करण्याची सर्वप्रथम घोषणा ब्रिटनने केली होती. त्यानंतर हे लसीकरण आजपासून सुरू झाले आहे. संपूर्णपणे चाचणी घेण्यात आलेली सुरक्षित अशी ही लस देण्याचे सुरू झाले असून सर्वप्रथम ८० वर्षापेक्षा अधिक वयाचे नागरिक आणि कोरोना योद्धा यांना ही लस सर्वप्रथम दिली जाणार आहे.
ही लस घेतल्यानंतर मार्गारेट यांनी प्रतिक्रीया दिली आहे की, मला खुप छान वाटते आहे. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे. माझी काळजी घेणाऱ्या आणि लस देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानत आहे. नवीन वर्षात मी माझ्या कुटुंबासमवेत वेळ घालवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.