नवी दिल्ली – जगभरात भारताची बिर्याणी खूप प्रसिद्ध आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं बिर्याणी बनवली जाते. परंतु आज आम्ही तुम्हाला एका अशा विशेष बिर्याणीबाबत सांगणार आहोत, जिला बनवण्यासाठी चक्क सोन्याचा वापर केला जातो. दुबईच्या एका रेस्टॉरंटनं या बिर्याणीला लॉन्च केलं आहे.
द रॉयल गोल्ड बिर्याणी असं या विशेष बिर्याणीचं नाव आहे. या बिर्याणीला सोन्याच्या थाळीमध्ये वाढलं जातं. या बिर्याणीत २३ कॅरेटचं खाण्यायोग्य सोनं असतं. एका थाळीसाठी १९,७०० रुपये मोजावे लागतात. रॉयल गोल्ड बिर्याणीला बनवणार्या बॉम्बे बोरो रेस्टॉरंटनं सांगितलं, की ही बिर्याणी गोल्ड लीफ कबाब, काश्मिरी मेमन कबाब, जुनी दिल्ली मेम्ने चोप्स, राजपूत चिकन कबाब, मुघलाई कोफ्ता आणि मलाई चिकन कस्तुरी, केसर तरकारी बिर्याणीच्या अस्तरावर वाढली जाते.
बिर्याणीसोबतच्या चटण्या आणि सॉसमध्ये निहारी सारण, जोधपुरी सारण, बदामी सॉस, बदाम आणि डाळिंबाचा रायता टाकला जातो. बिर्याणीच्या या थाळीत सर्व पदार्थ वाढून घेतल्यानंतर त्याच्यावर २३ कॅरेट सोन्याचा मुलामा लावला जातो. सोन्याचा मुलामा आपण खाऊ शकतो. या बिर्याणीचं एकूण वजन ३ किलो आहे.
द रॉयल गोल्ड बिर्याणीमध्ये एक विशेष गोष्ट ही आहे की, यामध्ये आपण आपल्या आवडीचे तांदूळ निवडू शकतो. ऑर्डर करण्यापूर्वी तुम्हाला बिर्याणी तांदूळ, खिमा तांदूळ आणि सेफ्रॉन तांदळाचा पर्याय दिला जातो. तांदळाचा पर्याय सांगितल्यानंतरच तुम्हाला बिर्याणी वाढली जाते.
बॉम्बे बोरो रेस्टॉरंटनं त्यांच्या वर्धापनदिनानिमित्त या विशेष बिर्याणीचा समावेश मेन्यूकार्डमध्ये केला आहे. दुबईमध्ये घराघरांत बिर्याणी बनवली जाते. तिथल्या लोकांना बिर्याणी खूप आवडते. त्यामुळेच इथले रेस्टॉरंट बिर्याणीच्या चवीबद्दल खूपच प्रसिद्ध आहेत.