मुंबई – रिअल इस्टेटच्या क्षेत्रातील हिरानंदानी समूह नाशकात कोट्यवधींची गुंतवणूक करणार आहे. तशी माहिती हिरानंदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी दिली आहे. नाशकात औद्योगिक व लॉजिस्टिक पार्क साकारला जाणार आहे.
हिरानंदानी म्हणाले की, कोरोनाच्या काळात एप्रिल ते जून या तिमाहीत विक्रीवरील तीव्र परिणामानंतर रिअल इस्टेट मार्केटमध्ये बरेच सुधार झाले आहेत. गेल्या वर्षातील याच महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये मोठ्या शहरांमध्ये घरे विक्री सरासरीपेक्षा २० टक्के सुधारणा झाली आहे. भारतातील आघाडीच्या रिअल्टी कंपन्या मधील हिरानंदानी ग्रुपने पुढील तीन वर्षांत विविध शहरांमध्ये डेटा सेंटर आणि औद्योगिक उद्याने विकसित करण्यासाठी ८ हजार ५०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना असल्याचे एका वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.
एप्रिल ते जून या तिमाहीत कोरोनाने थैमान घातल्याने लॉकडाऊनमुळे घरांच्या खरेदी-विक्रीवर तीव्र परिणाम झाला. त्यानंतर रिअल इस्टेट मार्केटमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. हिरानंदानी म्हणाले की, आम्ही नवी मुंबईत आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर सुरू केले आहे. आता ग्रेटर नोएडा येथे दुसरे आणि चेन्नई जवळचे तिसरे डेटा सेंटर बनवणार आहोत. डेटा साठवण क्षमतेची वाढती मागणी कमी करण्यासाठी हिरानंदानी समूहाने गेल्या वर्षी योटा इन्फ्रास्ट्रक्चरच्या आपल्या नवीन व्यवसायाने डेटा सेंटर पार्क विकसित केले. तसेच या ग्रुप मार्फत नाशकातही गुंतवणूक करण्यात येणार आहे.
औद्योगिक व लॉजिस्टिक पार्क
हिरानंदानी ग्रुप नाशिकमध्ये औद्योगिक व लॉजिस्टिक पार्क साकारणार आहे. नाशिकबरोबरच तळेगाव आणि चेन्नई येथेही असेच पार्क साकारले जाणार आहेत. या तिन्ही पार्कसाठी येत्या ३ वर्षात एकूण ३ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.