नवी दिल्ली – ग्लोबल वार्मिंगमुळे आणि वाढत्या तापमानामुळे हिमालयातील हिमनग वितळत असून हिमाचल प्रदेशात हिमकडे कोसळ्याची भिती व्यक्त होत आहे. तसेच या प्रदेशात पाणी पातळी वाढल्याने नवीन तलाव तयार होत आहेत.
आतापर्यंत या उंच भागात सुमारे ८०० लहान-मोठी तलाव तयार झाले आहेत. त्यापैकी ५५० हून अधिक तलाव हिमाचल प्रदेशातील धोकादायक भागात आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण परिषदेच्या हवामान बदल केंद्रातर्फे या तलावांचा सतत अभ्यास करण्यात आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार तापमानात वाढ झाल्याने हिमनग वितळणे अलिकडच्या काळात वाढले आहे. यामुळे कृत्रिम तलावांचे आकारही वाढत आहे. गेल्या काही वर्षांत सतलज, चिनाब, रवी आणि बियास खोऱ्यावर १०० पेक्षा जास्त नवीन तलाव तयार झाले आहेत. तसेच या तलावांमधील पाण्याचे प्रमाण सतत वाढत असल्याने त्यांचे परीक्षण करणे अधिक आवश्यक झाले आहे.
दरम्यान, चमोली येथील आपत्तीनंतर हिमाचल प्रदेशातही हिमनग आणि कृत्रिम तलाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हिमस्खलन प्रवण क्षेत्राव्यतिरिक्त हिमनदीच्या आसपासच्या भागातील लोकांना जागरूक राहण्यास सांगितले आहे. तसेच हिमनग आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला प्रत्येक बदलांचा अहवाल पाठविण्यास सांगितले आहे.