नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे नेते योगेंद्र यादव यांच्यासह एकूण २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत ९३ जणांना अटक केली आहे तर २००हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीची बैठक घेऊन दिल्ली हिंसाचार परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून, शांतता राखावी असे आवाहन दिल्लीचे पोलीस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी केले आहे. हिंसाचारात दिल्लीतल्या सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर केलेल्या हिंसक हल्ल्यात ८६ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
दिल्ली पोलिसांनी कालच्या हिंसाचारादरम्यान, कायद्याचे उल्लंघन करण, दंगे भडकावण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण आणि हत्त्यारांचा उपयोग करून सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे या कलमांखाली सुमारे २२ गुन्हे दाखल केले आहेत. दिल्लीच्या परिस्थितीवर पोलीस कडक नजर ठेऊन आहेत, आणि दाखल गुन्ह्यांसंदर्भात लवकरच कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.
ट्रॅक्टर रॅली संदर्भात शेतकरी संघटना आणि पोलिस यांच्यात झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर त्याचा मार्ग आणि वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र अटींचे पालन न करता शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला असल्याचंही, पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी सांगितले.
यांच्यावर दाखल झाले गुन्हे
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये योगेंद्र यादव, राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर, सतनामसिंग पन्नू यांची नावे आहेत. तसेच, पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू आणि लखा सिधाना यांचीही याप्रकरणी चौकशी होण्याची चिन्हे आहेत.