चंदीगड – शेतकरी आंदोलनावर केलेल्या टिप्पणीमुळे अभिनेत्री कंगना राणावतवर सातत्याने टीका होते आहे. हरियाणातील खाप पंचायतीने देखील तिच्यावर टीका केली आहे. या आंदोलनातील महिलेसंबंधी कंगनाने जे काही विधान केले त्याचा आम्ही निषेध करतो, असे प्रतिपादन पुनिया खापचे राष्ट्रीय प्रवक्ता आणि भाजप प्रदेश कार्यसमितीचे माजी सदस्य जितेंद्र छत्तर यांनी केले आहे. कंगनाने केलेले विधान महिलांचा अपमान करणारे आहे. सर्व खाप पंचायतींमध्ये याबद्दल रोष आहे. एक महिला असूनही महिलांसंबंधी तिने असे विधान करणे योग्य नाही. शेतकरी आंदोलनात सहभागी एक वृद्ध महिलेचा संबंध शाहीन बॅग प्रकरणाशी जोडत कंगनाने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती. ज्यावरून ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
या विधानाबद्दल खाप पंचायतींनी मिळून तिला एक नोटीस पाठवली आहे. त्याचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संपूर्ण देशभरात तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे छत्तर यांनी सांगितले. जर तिच्यात हिंमत असेल तर अशी विधाने केल्यानंतर तिने हरियाणा, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्ये प्रवेश करून दाखवावा, असा इशाराच त्यांनी दिला आहे. भविष्यात तिच्या चित्रपटांवर, कार्यक्रमांवर बहिष्कार घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.