मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोमय्या हे दररोज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेत्यांवर विविध प्रकारचे गंभीर आरोप करीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांनी अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांसमवेत जमीन खरेदी केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. आज पुन्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले. ठाकरे सरकार, महापौर पेडणेकर, मुंबई महापालिका आणि एसआरए यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सोमय्या यांनी सांगितले. शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांना वॉर्निंग दिली होती की, त्यांनी शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नये. यासंदर्भात सोमय्या म्हणाले की, शिवसेनेत हिंमत असेल तर त्यांनी मला हात लावून दाखवावे. त्यामुळे यापुढील काळात शिवसेना विरुद्ध सोमय्या असा सामना रंगणार आहे.