नवी दिल्ली – येणारा होळीचा आठवडा हा तसा लॉंग वीकेंड आहे. तेव्हा प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मने जबरदस्त तयारी केली आहे. अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, डिस्नी प्लस हॉटस्टार, झी5, एमएक्स प्लेयर या सर्व ठिकाणी नवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे.
२४ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर क्राइम सस्पेन्स थ्रीलर ‘हू किल्ड सारा’ या वेब सिरीजचा पहिला सीझन दाखविण्यात आला आहे. ही एक स्पॅनिश सिरीज आहे. एका व्यक्तीवर आपल्या बहिणीचा खून केल्याचा आरोप आहे. आणि ती व्यक्ती आपण निरपराधी असल्याचे कसे सिद्ध करते, त्याची ही गोष्ट.
२४ मार्च रोजी डिस्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर १२३२ किमी ही डॉक्युमेंटरी रिलीज झाली आहे. यात लॉकडाऊनच्या काळातील बाहेरून आलेले मजूर कशा पद्धतीने घरी गेले, ते दाखवले आहे. गाझियाबाद येथून बिहारला सायकलवरून जाणाऱ्या ७ मजुरांची कथा यात आहे. या प्रवासात त्यांना कसला आणि कसा त्रास झाला, हे या डॉक्युमेंटरीतून कळेल. विनोद कापडी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.
२५ मार्चला नेटफ्लिक्सवर ‘कॉट बाय अ वेव्ह’ ही रोमॅंटिक फिल्म रिलीज होणार आहे. ही इटालियन तरुणांची फिल्म आहे.
२६ मार्चला तर इतक्या वेबसिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, की प्रेक्षकांना काय पहावं, असा प्रश्न पडणार आहे.
सायलेन्स, कॅन यू हिअर इट? ही सस्पेन्स थ्रिलर फिल्म झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. मनोज वाजपेयी, प्राची देसाई आणि अर्जुन माथूर यात मुख्य भूमिकेत आहेत. पोलीस अधिकारी एसीपी अविनाश शर्माच्या भूमिकेत एक केस सोडवताना मनोज वाजपेयी दिसेल. घर साेडून जाणार असलेली एक महिला अचानक गायब होते, आणि काही दिवसांनी तिचा मृतदेह सापडतो. या केसचा तपास करताना मनोज वाजपेयी दिसेल.
पगलेट हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. उमेश बिष्ट यांनी याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. रघुबीर यादव, आशुतोष राणा, शीबा चढ्ढा, राजेश तेलंग हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसतील. परंपरेच्या नावाखाली मुलींना कायम वेगळी वागणूक देणाऱ्या, तिचे आचार विचार काय असावेत, हे ठरवणाऱ्या पद्धतींवर हा चित्रपट प्रकाश टाकेल. याशिवाय आणख्ी काही चित्रपटही नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहेत.
ओके कॉम्प्युटर ही विज्ञानावर आधारित वेबसिरीज डिस्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर रिलीज होणार आहे. नजीकच्या भविष्यकाळात आपल्याला काय अनुभवायला मिळेल यावर या सिरीजमध्ये हलक्याफुलक्या प्रकारे भाष्य केले आहे. ‘शीप ऑफ थेसियस’ आणि ‘तुंबाड’चे आनंद गांधी यांची या सिरीजच्या निर्मितीत प्रमुख भूमिका आहे. विजय वर्मा, राधिका आपटे, जॅकी श्रॉफ यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. हिंदीशिवाय अन्य दाक्षिणात्य भाषांमध्येही ही सिरीज प्रदर्शित होणार आहे.
ऍमेझॉन प्राईम व्हिडीओवर ‘चाचा विधायक है हमारे’चा दुसरा सीझन येणार आहे. याशिवाय, इनव्हिजीबल ही ऍनिमेटेड सुपरहीरो फिल्म देखील २६ मार्चला रिलीज होणार आहे.
तर एमएक्स प्लेयरवर ‘हे प्रभू’ या वेबसिरीजचा दुसरा सीझन येणार आहे. ही एक रोमँटिक कॉमेडी सिरीज आहे