मुंबई – वडा पाव हे तसं तर मुंबईतलं स्ट्रीट फूड. पण त्याच्या चवीमुळे आणि कष्टकऱ्यांच्या बजेटमधील खाद्यपदार्थ असल्याने अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला. अगदी सातासमुद्रापारही गेला. वडा – पावच्या गाड्या कुठेही कितीही उघडल्या तरी त्याला मरण नाही, असं म्हटलं जातं, ते अगदी खरं आहे. वडा पावबद्दल एवढी चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे, सध्या या वडा पावचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे.
काही वर्षांपूर्वी उडत्या डोशाची चर्चा होती. आता तशीच चर्चा या उडत्या वडा पावची सुरू आहे. यात एक वडा पाव विक्रेता मस्तपैकी आपल्याच तंद्रीत वडे उडवून ते पावात भरून देतो आहे. सुरुवातीला तो पावभाजी करतात, तशा मोठ्या तव्यावर बटर घालून त्यावर कसलासा मसाला घालतो. ते मस्त मिक्स करतो आणि मग त्यावर पाव भाजून घेतो. मग तळलेले वडे उडवून ते देखील त्या मिश्रणावर मस्तपैकी भाजून घेतो. आणि मग ते पावात भरून सर्व्ह करतो. पावभाजीप्रमाणे पाव भाजून देणे, हे बहुधा या विक्रेत्याचे वैशिष्ट्य असावे. ‘आमची मुंबई’ हँडलवरून हा व्हिडीओ यूट्यूबवर प्रसिद्ध झाला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!