मनाली देवरे, नाशिक
….
आयपीएल २०२० च्या एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा ६ गडी राखून पराभव केला. या निकालानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे आव्हान आता समाप्त झाले असून सनरायझर्सला माञ आणखी एक संधी मिळाली आहे. अंतिम सामन्यात पोहाचण्यासाठी आता क्वालिफायर–२ या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सला पराभूत करण्याची किमया सनरायझर्सला करून दाखवावी लागेल.
विजयासाठी जी धावसंख्या गाठायची होती ती फारशी मोठी नव्हती. १३२ धावा म्हणजे षटकामागे सरासरी ७ धावांची गरज राखायचे काम सनरायझर्सला करायचे होते. सनरायझर्सकडे एकटा स्टार फलंदाज आहे तो म्हणजे डेव्हीड वॉर्नर. परंतु तो मोहम्मद सिराजच्या लेगस्टंप बाहेर जाणा–या एका चेंडूवर तिस–या अंपायरच्या निर्णयाने बाद दिला गेल्यानंतर आता सनरायझर्स हैद्राबाद चे आव्हान संपुष्टात येणार अशीच भाकीतं समोर येत होती. परंतु, क्रिकेटमध्ये आणि खास करून टी२० सामन्यात अशी भाकीतं सपशेल फोल ठरतात. ही अनिश्चीत कामगिरी पार पाडण्याचे काम सनरायझर्स या निडर संघाने पुर्ण केले. समोर यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी आणि अॅडम झंपा यांच्यासारखे सातत्याने चांगली कामगिरी करणारे गोलंदाज असतांना देखील सुरूवातीला मनिष पांडेने (२४ धावा) डाव सावरला. या डावाला केन विल्यमसनने (५० धावा) आकार दिला आणि जेसन होल्डर या उंचापु–या वेस्टइंडीयन अष्टपैलू खेळाडून लागोपाठ दोन रॉकेट चौकारांच्या मदतीने विजय गाठला. सनरायझर्सच्या कामगिरीला या सामन्यात तोड नव्हती.
या सामन्यात विराट कोहलीने सलामीला फलंदाजीसाठी येण्याचा एक “अजब” निर्णय घेतला. देवदत्त पडीकलने या सिझनमध्ये सातत्याने धावा केलेल्या आहेत. त्या मानाने अॅरॉन फिंचची कामगिरी झालेली नसली तरी, या महत्वाच्या सामन्यात ही सलामीची जोडी फोडण्याइतके सबळ कारण विराट कोहलीकडे नव्हते. परंतु सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारा हा निर्णय घेवून कोहली सलामीला मैदानात उतरला आणि नव्या चेंडूंचा सामना करतेवेळी संघाच्या फक्त ७ धावा झालेल्या असतांना पॅव्हेलियनमध्ये परतला देखील. वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने संपुर्ण सिझनमध्ये टाकली नाही इतकी सुरेख गोलंदाजी या सामन्यात टाकली आणि त्याच्या सुरूवातीच्याच स्पेलमध्ये सलामीला पाहुणा म्हणून आलेल्या विराट कोहलीसह सातत्याने फलंदाजी करणा–या देवदत्त पडीकलचे बळी घेतले. मोठी धावसंख्या उभारण्याचे स्वप्न घेवून फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेजंर्स बंगलोर संघाचे मनसुबे उधळले गेले ते नेमके इथेच. कारण त्यावेळेला त्यांच्या धावा झाल्या होत्या अवघ्या १५. पुढे मग अॅरॉन फिंच ३२ धावा आणि एबी डिव्हीलीयर्स ५६ धावा, यांनी थोडाफार डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, संघाला मजबुत पायाभरणी न करता आल्याने २० षटकात ७ बाद १३१ अशा माफक धावसंख्येचे आव्हान त्यांनी सनरायझर्सला दिले.
या सिझनमध्ये एकवेळ अशी आली होती की सनरायझर्स हा संघ सर्वांमध्ये दुबळा संघ वाटत होता. सर्वाधिक धावा ज्या फलंदाजांनी या सिझनमध्ये बनवल्या आहेत त्यांच्या यादीत पहिल्या १० खेळाडूंत डेव्हीड वॉर्नर या एकमेव खेळाडूचे नाव तुम्हाला दिसेल. गोलंदाजीत माञ रशिद खान आणि टी. नटराजन या दोन मध्यमगती गोलंदाजांची नावेही पहिल्या १० गोलदांजामध्ये तुम्हाला आढून येतील. सनरायझर्स या मोजक्या खेळाडूंच्या कामगिरीवर इतक्या दुरवर पोहोचले ही संघासाठी खुप महत्वाची गोष्ट आहे. दिल्ली कॅपीटल्सशी होणारी त्यांची लढत त्यामुळेचे चुरशीची होईल अशी अपेक्षा आहे.
आता पुढचा सामना रविवारी
आता रविवारी ८ नोव्हेंबरला अबुधाबीत होणा–या क्वालिफायर–२ या सामन्यात दिल्ली कॅपीटल्स वि. सनरायझर्स हैद्राबाद असा सामना होईल. ही लढत सेमी फायनलच्या लढतीसारखीच राहील कारण, या सामन्यातला विजेता संघ अंतिम सामन्यात पोहोचेल. अंतिम सामना दुबईत १० नोव्हेंबरला होणार आहे आणि या सामन्यात मुंबई इंडीयन्सने आधीच प्रवेश प्राप्त केला आहे.