नवी दिल्ली – ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघातील पाच खेळाडूंनी बायो – बबल (जैवसुरक्षा) प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे प्रकरण सध्या चांगलेच गाजते आहे. पण, तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने हा कुटील डाव रचल्याचे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
बीसीसीआय पाठिशी
आम्ही पूर्णपणे खेळाडूंच्या बाजूने असल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. हे खेळाडू तिसऱ्या कसोटीत खेळू शकतील की नाही हे, 72 तासांच्या आत कळणार आहे. 7 जानेवारीपासून सुरू होणारा तिसरा कसोटी सामना सिडनी येथे खेळावला जाणार आहे.
व्हायरल व्हिडिओ आहे कारण
2 जानेवारीला सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओच्या आधारे भारतीय खेळाडूंनी जैवसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण ऑस्ट्रेलियन प्रसार माध्यमांनी उचलून धरले. त्यानंतर दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने याबाबत एक संयुक्त स्टेटमेंट जारी केले. या घटनेनंतर रोहित शर्मा, रिषभ पंत, नवदीप सैनी, शुभम गिल आणि पृथ्वी शॉ हे पाचही खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत.
उल्लंघन नाही
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला संपूर्ण घटनेची माहिती दिली. पाऊस असल्याने हे खेळाडू हॉटेलच्या बाहेर उभे होते. मग ते आत गेले. या संपूर्ण प्रकरणात कुठेही भारतीय संघाकडून जैव सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे, असे आम्हाला वाटत नाही. कारण भारतीय संघाला या नियमांची माहिती आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक या प्रकरणाला हवा देण्याचे काम करत असल्याचा आरोपही या अधिकाऱ्याने केला.