नवी दिल्ली – काही मुले जन्मजात प्रतिभावान असतात, तर काही मेहनतीने आपल्याला जे हवे ते प्राप्त करून घेतात. रांची येथील विराट माकन हा या पहिल्या प्रकारात मोडतो. आपल्या जन्मजात प्रतिभेने त्याने भल्याभल्याना चकित करून सोडले आहे.
एखाद्या कॅलक्युलेटरपेक्षाही अधिक वेगाने विराट आकडेमोड करू शकतो. गणितातले पाढे सुलट आणि उलट अशा दोन्ही प्रकारांत तो म्हणू शकतो. 75 ते 2 पर्यंतचे पाढे, तेही उलट म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याने स्थान पटकावले आहे. मुलांना अलीकडे 30 पर्यंतचे पाढेही मोठ्या मुश्किलीने येतात, तिथे हा पठ्ठ्या 75 पर्यंतचे पाढे पाठ करतो, आणि उलट क्रमाने म्हणतोही. यासाठी त्याला अवघी 11 मिनिटे आणि 6 सेकंद लागले.
विराटचे वडील गगन माकन हे स्वतःचे क्लासेस चालवतात. लॉकडाऊनच्या काळात सगळं ठप्प झालेलं असताना गगन माकन यांनी मुलाला काहीतरी वेगळं शिकवावं म्हणून हा प्रयोग केला. आणि ते त्यात यशस्वीही झाले. विराट सध्या आर्मी प्री प्रायमरी शाळेत शिकतो आहे. पण कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. आता त्याला आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रम नोंदवून मग गिनीज बुकातही आपले नाव नोंदवायचे आहे.