नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयानं हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णय लिहिण्याच्या पद्धतीवर कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयाची ऑर्डर वाचून आम्हाला डोक्याला टायगर बाम लावण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात न्यायाधीशांनी ताशेरे ओढले आहेत. कोणताही निर्णय सोप्या भाषेत लिहिला पाहिजे. त्यामध्ये थिसिस नसावं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
न्यायाधीश डी. वाय चंद्रचूड आणि न्यायाधीश एम. आर. शाह यांच्या खंडपीठात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल विशेष याचिकेवर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाच्या निर्णयात काय लिहिलंय ते काहीच समजत नाहीये. त्यामध्ये मोठी मोठी वाक्ये लिहिलेली आहेत. सुरुवातीला काय सांगायचंय आणि शेवटी काय सांगायचंय हेच समजत नाहीये. एक स्वल्पविराम दिसला पण तोसुद्धा व्यवस्थित दिला गेला नाही. निर्णय वाचताना माझ्या समजुतीवरच मला शंका येत होती, अशा शब्दात न्यायाधीश शाह यांनी ताशेरे ओढले. कोणताही निर्णय सामान्य माणसाला समजेल, अशा साध्या सोप्या भाषेत असावा. शेवटचा परिच्छेद वाचल्यानंतर तर मला टायगर बाम लावावा लागला, असं न्यायाधीश शाह म्हणाले.
सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत निर्णय दिला गेला पाहिजे. मी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी निर्णय वाचायला सुरुवात केली आणि १० वाजून ५५ मिनीटांनी जेव्हा तो पूर्ण वाचला. तेव्हा मला काय होतंय ते काहीच समजत नव्हतं, असं न्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. माझी परिस्थिती कल्पनेच्या बाहेर अशीच आहे. न्यायाधीश कृष्णा अय्यर यांच्या निर्णयांचा दाखला देत न्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांचं कौतुक केलं. त्यांचे निर्णय साधे सरळ आणि स्पष्ट शब्दात होते. त्यामुळे ते वाचण्यात कोणतीच समस्या येत नव्हती, असं ते म्हणाले.
दरम्यान, हे प्रकरण एका सरकारी कर्मचाऱ्याशी संबंधित आहे. केंद्र सरकारच्या औद्योगिक न्यायालयानं कर्मचाऱ्याला दोषी मानून दंड केला होता. या निर्णयाला कर्मचाऱ्यानं हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयानं औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.