नाशिक – उत्तर प्रदेशात वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचारांबाबत दोषींवर कडक कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्राव्दारे विनंती केली आहे.
पत्रात नमूद करण्यात आले आहे की, उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाजपचे सरकार आहे. दिनांक १४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशात हाथरस मध्ये १९ वर्षीय दलित युवती वर चौघांनी मिळून सामुहिक बलात्कार केला. यानंतर पिडीतेला दिल्लीच्या सफदरगंज रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने १६ दिवसानंतर तिला मृत्युला सामोरे जावे लागले. हे नक्कीच संतापजनक आहे. आपण देशात ज्या प्रमाणे जाहिरात बाजी करता त्यापेक्षा उलटच उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसतो या कारणाने महिला, युवती, सर्व सामान्य जनता सुरक्षित नाहीत असे आमचे म्हणणे आहे. आपण देशात रामराज्य आणू अशी स्वप्ने जनतेला दाखवता मात्र आपल्या काळात गुंडाराज्य फोफावत चालला. उत्तर प्रदेशात देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी उभारण्या पेक्षा कायदा सुव्यवस्था, सक्षम पोलिस यंत्रणा उभी करा जेणेकरून महिलांना राज्यात अत्याचाराला बळी पडावे लागणार नाही. आपण कंगणा सारख्या अभिनेत्री ला सुरक्षा देता मात्र महिला, युवती सुरक्षे वाचून वंचित आहे. काल च्या घटनेत बलात्कारीत पिडीतेचा मृतदेह कुटुंबांच्या स्वाधीन न करता पोलिस यंत्रणे मार्फत अंत्यविधी उरकला जातो हे देखील भयावह आहे तेव्हा पोलिस प्रशासनाला असे आदेश कोणी दिले याचीही चौकशी झाली पाहिजे तसेच अत्याचारा मधील आरोपींना जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराच्या वतीने आम्ही महिला पदाधिकारी करतो, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
याप्रसंगी भामरे यांच्यासह कार्याध्यक्ष नगरसेविका सुषमा पगारे,आसिया शेख, पुनम शहा, मिनाक्षी गायकवाड, स्वाती बिडला, सरोज गरूड,भारती चित्ते, शाकेरा शेख, दुर्गा कल्याणी आदि महिला उपस्थित होत्या.